Summer Onion : उन्हाळ कांद्याची आवक वाढली
जळगाव: खानदेशात गेल्या आठवड्यात उन्हाळ कांद्याची आवक वाढली आहे. दरात मोठी वाढ अपेक्षित आहे. पण समित्यांमधील सकाळच्या वेळेस रखडणाऱ्या लिलाव प्रक्रियेचाही फटका बसत आहे. गेल्या पंधरवड्यात ही आवक सुमारे २०० क्विंटलने वाढली आहे. दर प्रतिक्विंटल ६०० ते ८०० रुपये, असे आहेत.
नंदुरबारातही आवक सुरू आहे. धुळ्यात आठवडी बाजार जोमात सुरू आहेत. जळगाव जिल्ह्यात काही उपबाजारांत आवक अधिक आहे. प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव सकाळीच होत आहेत. तर काही खरेदीदार थेट शिवारातून कांद्याची खरेदी करीत आहेत. कांद्याचे दर मार्चच्या सुरवातीला ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल असे होते.
तर फेब्रुवारीत सरासरी ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. सध्या उन्हाळ कांद्याची आवक सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील अडावद (ता. चोपडा), किनगाव येथील बाजारात लिलाव प्रक्रिया जोमात सुरू आहे. परंतु या भागातील व्यापारी, खरेदीदार थेट शिवारातून कांद्याची खरेदी करीत असून, त्याची पाठवणूक मोठ्या खरेदीदारांकडे करीत आहेत. खरेदी सुरू आहे. पण दरांबाबत समाधानकारक स्थिती नाही.
जळगाव, धुळे, पिंपळनेर (ता. साक्री) येथील बाजार समित्यांमध्ये लिलाव प्रक्रिया सुरू आहे. परंतु आवक वाढल्याने लिलाव रखडत होत आहेत. जळगाव बाजार समितीत गेल्या आठवड्यात प्रतिदिन सरासरी ८०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. तर सरासरी दर प्रतिक्विंटल ७०० रुपये, असा होता.
लिलावात स्पर्धा नसल्यानेच कांदा दराला फटका
कमी दर्जाच्या कांद्याला प्रतिक्विंटल ४०० रुपये दर मिळाला. पण सध्या दर्जेदार कांदा येत आहे. याची मागणीदेखील आहे. जळगाव येथील बाजारात औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव, सिल्लोड, जालना, बुलडाणा भागातूनही कांद्याची आवक होत आहे.