या जिल्ह्यात आता मास्क वापरणे अनिवार्य जिल्हाधिकाऱ्यांनी का दिलेत आदेश?
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट झालाय. देशात गेल्या २४ तासांत ३ हजार ६४१ रुग्ण आढळले. सध्या दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेशात सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. छत्तीसगडमध्ये मुलींच्या वसतिगृहात कोरोनाचे १९ रुग्ण आढळले. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. छत्तीसगडमधील मुलींच्या वसतिगृहातील ११ विद्यार्थिनी पॉझिटीव्ह असल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.
राजधानीतही कोरोनाचे २९३ रुग्ण आढळले. दोघांचा मृत्यू झाला. गेल्या १५ दिवसांमध्ये नवीन प्रकरणात सहा पटीने वाढ झाली आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्याही १२ पटीने वाढली आहे. दिल्लीसोबतच महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य
राज्यात वाढत असलेल्या सिझनल इन्फ्लुएन्झा आजार आणि कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक पूर्वतयारी राबवण्यात येत आहे. सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य असल्याचे आदेश दिले आहेत.
बँका, शाळा-महाविद्यालयात मास्क अनिवार्य
या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालये यामधील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी मास्क वापरावा
तसेच गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणी जसे आठवडी बाजार, एसटी स्टँड परिसर, यात्रा, मेळावे, लग्नसमारंभ, मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतात. अशा सर्व ठिकाणी सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा. सामाजिक अंतर राखून वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी जयवंशी यांनी केले आहे.
गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी आठवडी बाजार, सर्व ठिकाणी सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा. इतर जिल्ह्यातही कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे स्वतः काळजी घेणे गरजेचे आहे.