सावकाराकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून बीडच्या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न
बीड : बीडच्या गेवराई येथे खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून एका युवकाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. युवकाची प्रकृती चिंताजनक असून सध्या बीड जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शेख असेफ नियाझुद्दीन असं विष प्राशन केलेल्या तरुणाचे नाव आहे.
शेख असेफ नियाझुद्दीन याने एका खाजगी महिला सावकाराकडून पैसे घेतले होते. सदरील पैसे ऊस तोडणी करून आल्यानंतर परत केले जाणार होते. मात्र सावकाराकडून सतत दबाव येत असल्याने या युवकाने सुसाईड नोट लिहित आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. दरम्यान या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सावकार की बोकाळली आहे. यामध्ये अनेक शेतकरी सावकाराच्या दबावाच्या ओझ्याखाली आपलं आयुष्य संपवत आहे. सावकाराच्या जाचातून सुटताना अनेक जण आपला त्रास कोणालाही सांगत नाहीयेत. बेकायदेशीर सावकारकी करत बेहिशोबी टक्केवारी लावून सावकार मंडळी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वसुली करत आहेत. अनेक वेळा यात चक्रवाढ व्याज लावल्याचीही प्रकरणं समोर आली आहेत. हे सावकार समोरच्याकडून अधिकचा पैसा वसूल करत आहेत. पैसा वसूल करण्यासाठी सावकार मंडळी अनेक फंडे वापरत आहेत.
नेमकी घटना काय?
गेवराई तालुक्यात एका महिला सावकाराकडून शेख असेफ या युवकाने कर्ज घेतलं होतं. मात्र ऊस तोडणीनंतर हे कर्ज मी तुम्हाला देऊन टाकतो, असं म्हटल्यानंतरही या खाजगी महिला सावकाराकने शेख असेफकडे पैशांसाठी तगादा सुरूच ठेवला.अनेक विनवण्या करूनही हा तगादा कमी झाला नाही. अखेर या युवकाने सुसाईड नोट लिहित विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी गेवराई पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अधिकचा तपास सुरु केला आहे. विष प्राशन केलेल्या युवकाची प्रकृती सध्या चिंताजनक असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
सावकाराच्या जाचाला कंटाळला, धुळ्याच्या २० वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल
सावकारांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून धुळ्याच्या २० वर्षीय तरुणाने तापी नदीत उडी मारुन आत्महत्या केली. शनिवारी दुपारी ही घटना घडली. दुर्गेश दीपक धनगर असं मृत तरुणाचे नाव आहे.तो शिरपूर शहरातील क्रांतीनगरमध्ये राहण्यास होता.