Tur and Urid Stock : तूर आणि उडीद डाळीच्या साठ्याबाबत सरकारकडून निर्बंध, कायदा मोडल्यास होणार कारवाई
Tur and Udid pulses : देशात तूर आणि उडीद या डाळींना मोठी मागणी असते याचबरोबर रोजच्या जेवणात याला महत्व आहे. या दोन डाळींचे दर वाढले तर याचा थेट परिणाम सामान्यांवर होतो.म्हणून सरकारने याबाबत अधिसूचना काढत या तूर आणि उडिद डाळींचा अतिरिक्त साठा करण्यावर येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत.
घाऊक आणि किरकोळ व्यापारी तसेच डाळ तयार करणाऱ्या गिरण्या आणि आयातदारांनाही हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. असे साठे आढळल्यास व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
केंद्र शासनाच्या fcainfoweb.nic.in/psp या पोर्टलवर याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार घाऊक व्यापाऱ्यांकरता तूर आणि उडीद डाळीसाठी प्रत्येकी २०० टन, किरकोळ व्यापराऱ्यांकरता ५ टन, मोठ्या साखळी दुकानांकरता प्रत्येक आऊटलेटसाटी ५ टन आणि डेपोसाठी २०० टन, गिरण्यांसाठी गेल्या तीन महिन्यातील उत्पादन किंवा वार्षिक स्थापित क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे जास्त असेल ते लागू राहील.
निर्यातदारांना सीमा शुल्क नोंदणीच्या तारखेपासून ३० दिवसांपेक्षा जास्त कालावधीनंतर साठा करुन ठेवता येणार नसल्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५ च्या कलम ३ अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांतर्गत, डाळींसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत होणारी कमालीची वाढ रोखण्यासाठी केंद्राने हे कायदे केले आहेत.