इंदापूर APMCच्या सभापतीपदी विलास माने तर उपसभापतीपदी रोहित मोहोळकर बिनविरोध निवड
इंदापूर: इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून शनिवारी (ता. २०) बाजार समितीच्या सभापतीपदी विलास सर्जेराव माने तर उपसभापतीपदी रोहित वसंतराव मोहोळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. माजी सभापती आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीच्या सभापतीपदी विलास माने तर उपसभापतीपदी रोहित मोहोळकर यांसारखे अनुभवी चेहरे मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.या निवडीनंतर बाजार समितीची आर्थिक उलाढाल वाढवण्यावरती भर दिला जाईल. आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व संचालकांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील व पारदर्शक कारभार केला जाईल अशी प्रतिक्रिया नूतन सभापती विलास माने व उपसभापती रोहित मोहोळकर यांनी दिली आहे.
इंदापूरच्या राजकारणात विलास माने यांचे मोठे योगदान आहे.
यापूर्वी त्यांनी इंदापूर बाजार समितीचे सभापती, उपसभापतीपदासह संचालक पद देखील भुषवले आहे. बाजार समितीच्या कामकाजाचा तगडा अनुभव व सर्वांना जेष्ट व्यक्तीमत्व असल्याने पुन्हा एकदा बाजार समितीच्या सभापतीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे. रोहित मोहोळकर एक युवक, अभ्यासू आणि अनुभवी चेहरा व सरपंचपद भुषवत असल्याने उपसभापतीपदी त्यांची वर्णी लागली आहे .