नगर जिल्ह्यात पाणी टंचाई , टँकरने पाणीपुरवठा सुरु
गेल्या तीन-चार वर्षांत सलग झालेल्या चांगल्या पावसामुळे बळीराजा सुखावला होता. परंतु यंदा पावसाने हात आखडता घेतला आहे. जिल्ह्यात अद्याप मॉन्सूनचा मागमूस दिसत नसल्याने चिंता वाढली आहे.
पाऊस नसल्याने पेरा नाही, परिणामी बियाणे आणि खतसाठा पडून आहे. पावसाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाईच्या झळा वाढू लागल्या आहेत.सध्या ३४ गावे आणि १५३ वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात दहा शासकीय तर १६ खासगी टँकरचा समावेश आहे.
नगर जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पावसाअभावी बाजारात शुकशुकाट आहे. दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढत आहे. ३४ गावे आणि १५३ वाड्यांमधील ६३ हजार ३४४ नागरिकांना २६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ही स्थिती असली, तरी धरणांमध्ये मात्र अद्याप मुबलक पाणीसाठा आहे. सर्वाधिक पारनेर तालुक्यातील १५ गावे आणि ८९ वाड्यांमधील २४ हजार ६८४ नागरिकांचा यामध्ये समावेश आहे.
भंडारदरा, मुळा आणि निळवंडे या तीन धरणांमध्ये १७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. सद्यःस्थितीमध्ये मोठ्या प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा असल्याचे पाटबंधारे विभाग सांगत असला तरी सध्याची पावसाची परिस्थिती पाहता पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.