शिरपूर शहरात सापडला शस्त्रसाठा, ते शस्त्र कशासाठी बोलावले - पोलिसांसमोर प्रश्नचिन्ह
धुळे : शिरपूर फाटा येथे दोन जण दुचाकीने येत आहेत. त्यांच्याकडे तलवारी असल्याची गुप्त बातमी शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना मिळाली. त्यांनी डीबी पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने शिरपूर फाट्यावर सापळा लावला. संशयित दुचाकीस्वारांना पकडले. त्या दोघांची नावे रोहित गिरासे आणि मनीष ओंकार गिरासे अशी आहेत. तलवारी सापडल्याने खळबळ उडाली आहे. तलवारी आणणारे कुणाला देणार होते. त्या तलवारींचा उपयोग काय करणार होते, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
तलवारी घेऊन येत होत्या
धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर पोलिसांनी 11 तलवारी जप्त केल्या आहेत. शहरातील शिरपूर फाटा परिसरातून या तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर यांना मिळालेल्या माहितीनुसार दोन व्यक्ती हे शिरपूर फाटा परिसरामध्ये तलवारी घेऊन येत आहेत.
प्लास्टिक पिशवीत तलवार
या माहितीच्या आधारावरती पोलिसांनी सापळा रचला. यात संशयित मोटरसायकल पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी या मोटरसायकलसोबत असलेल्या रोहित गिरासे आणि मनीष गिरासे या दोघांची चौकशी केली. या चौकशीमध्ये मोटरसायकलला एक तलवार प्लास्टिकच्या पिशवीत बांधलेली आढळून आली.
वापर कशासाठी करायचा होता?
त्यानंतर पोलिसांनी या दोघांची चौकशी केली. या चौकशीमध्ये रोहित गिरासेने गॅरेजमध्ये ठेवलेल्या अजून दहा तलवारी पोलिसांना काढून दिल्यात. या तलवारी नेमक्या कुठून आणल्या गेल्या होत्या? तसेच त्यांचा वापर कशासाठी केला जाणार होता? याची चौकशी पोलीस करीत आहेत.या प्रकरणी दोघा संशयितांविरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र शहरात 11 तलवारी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस आता या आरोपींची कसून चौकशी करत आहेत. त्यांच्याकडून काही हाती सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या तलवारी तयार करणारे कोण आहेत. त्या कुठून आल्यात, याचा तपास लावला जाणार आहे. पोलीस आता या कामासाठी लागले आहेत.