आमदाराला वर्षाला 4 क्विंटल, मुख्यमंत्र्यांना 1500 क्विंटल तर पंतप्रधानांना ट्रकभर कांदे देणार…बच्चू कडूंची काय आहे योजना
मुंबई : राज्यात लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरु आहे. महायुतीमधील तिन्ही पक्ष या योजनेचे श्रेय घेण्याचे प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी या योजनेमुळे विरोधकांनीही धास्ती घेतली आहे. विरोधक या योजनेवर उघडपणे टीका करु शकत नाही. त्यामुळे सरकार आल्यास नव्याने ही योजना आणणार असल्याचा दावा करत आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी या योजनेवर टीका केली आहे. तुम्ही काय आम्हाला योजना देतात? आमच्या कांद्याला भाव द्या, आम्ही प्रत्येक आमदाराला वर्षाला 4 क्विंटल, मुख्यमंत्र्याला 1500 क्विंटल तर पंतप्रधानांना ट्रकभर कांदा मोफत देऊ, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. नाशिक जिल्ह्यातील उमराणा (देवळा) येथील सभेत ते बोलत होते.
काय म्हणाले बच्चू कडू
नाशिकच्या दौऱ्यावर आलेल्या प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी देवळ्याच्या उमराणा येथे जाहीर सभा घेतली. या सभेत सरकारच्या लाडक्या बहीण योजनेवर त्यांनी सडकून टीका केली. तुम्ही काय आम्हाला योजना देतात? आम्ही तुम्हाला योजना देतोय. आमच्या कांद्याला भाव द्या. आम्ही प्रत्येक आमदाराला वर्षाला 4 क्विंटल, मुख्यमंत्र्यांना 1500 क्विंटल तर पंतप्रधानांना ट्रकभर कांदा मोफत देऊ.
निर्यात शुल्क रद्दवर टीका
केंद्राच्या निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णयाचाही बच्चू कडू यांनी चांगलाच समाचार घेतला. सरकारकडून फालतूगिरी सुरु आहे. आमच्याकडे कांदा असल्यावर हस्तक्षेप करत नाही. शेतमालाचे भाव पडतात तेव्हा एकही खासदार बोलत नाही. तेव्हा तुम्हाला पक्ष प्रिय असतो. तिकीट भेटले आम्ही तुमचे गुलाम आहोत, असे हे नेते करतात. आता आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहोत. तुम्ही आम्हाला रडवले आहे. आता आम्ही तुम्हाला रडवणार आहोत.कांदा निर्यात रद्द निवडणुकीपूर्ती असल्याची माहिती यावेळी कडू यांनी दिली आहे .
प्रहारचे उमदेवार जाहीर
राज्यातील राजकारणाची परिस्थिती अस्थिर आहे. काँग्रेस आणि भाजपने निर्माण केलेली व्यवस्था लुटणारी आहे. तिला उखडून फेकणार आहोत. दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी काँग्रेस, वन काँग्रेस या राजकीय परिस्थितीत आपण जीवाचे रान करून आपल्या विचाराचे आमदार निवडून आणावे, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केले. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी नाशिक जिल्ह्यातून आगामी विधानसभेचे रणशिंग फुगले आहे. चांदवड -देवळा मतदार संघातून गणेश निंबाळकर तर निफाडमधून गुरुदेव कांदे यांची प्रहारकडून उमेदवारी जाहीर केली.