दूध उत्पादक शेतकऱ्यांना झटका, दूध खरेदी दरात मोठी कपात
-गायीच्या दुधाची खरेदी करताना 3.5 फॅट आणि 8.5 SNF करिता 33 ऐवजी 30 रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे
कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांना तगडा झटका बसला आहे. कोल्हापूर आणि सांगलीत दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दूधउत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. प्रति लिटर 3 रुपयांचा कपात करण्याचा निर्णय दूध उत्पादक संघांनी घेतला आहे. 
गायीच्या दुधाची खरेदी करताना 3.5 फॅट आणि 8.5 SNF करिता 33 ऐवजी 30 रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी व सहकारी दूध संघटनेच्या कोल्हापूर विभागातील प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
दर कपातीचा निर्णय का?
दूध भुकटी, लोणी, दुधाचे बाजारातील खरेदी-विक्रीचे दरांची तुलना केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाचा दूध खरेदीचा दर किमान प्रतिलिटर दर 28 रुपये आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात इतर संघ 27   ते 28 रुपये अशा दराने गाय दूध खरेदी करतात. मात्र कोल्हापुरात गाय दूध खरेदी दर जास्त आहे. त्यामुळे लोणी, दूध भुकटी याची उत्पादन किंमत जास्त येत असल्याने बाजारामध्ये त्याची स्पर्धात्मक दराने विक्री करू शकत नाही. याशिवाय गाय आणि म्हैस दूध मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. यामुळे दूध कमी करणे गरजेचं होतं, असं मत दूध संघांनी व्यक्त केलं.