अजितदादांची सरशी, शिंदे गटाला मोठा धक्का, दोन खाती राष्ट्रवादीकडे - मुख्यमंत्र्यांचे ओएसडी राज्यपालांकडे
मुंबई : शिंदे सरकारमधील खाते वाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. आजच राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांचं खातं वाटप करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या खाते वाटपात शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाकडील दोन खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहेत. त्यामुळे शिंदे गटासाठी ही मोठी धक्कादायक बातमी असल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी पत्र घेऊन थेट राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे खाते वाटप कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्या 8 सहकाऱ्यांनाही पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. मात्र, आठ दिवस उलटले तरी या मंत्र्यांना खाते देण्यात आले नाही. अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यास शिंदे गटाने विरोध केला होता. त्यामुळे खाते वाटप रखडलं होतं. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांनी अर्थ खातं तर स्वत:कडे घेतलंच पण शिंदे गटाकडील दोन खातीही हिसकावून घेतली आहेत. त्यामुळे शिंदे गटात चलबिचल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ओएसडी राजभवनावर
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी राजभवनावर गेले आहेत. बंद लिफाफा घेऊन ते राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे गेले आहेत. या लिफाफ्यात खाते वाटपाची यादी आहे. राज्यपालांच्या मंजुरीनंतर हे खाते वाटप जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला कोणती कोणती खाती मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
अजितदादांनाच अर्थ
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांनाच अर्थ खातं देण्यात आलं आहे. तसेच सहकार, सामाजिक न्याय, महिला व बालकल्याण, अन्न आणि नागरी पुरवठा ही भाजपकडील खातीही राष्ट्रवादीला देण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडील कृषी आणि अल्पसंख्यांक खातंही मिळवण्यात अजित पवार यशस्वी झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
सत्तारांचं काय होणार?
शिंदे गटाचे आमदार आणि नेते अब्दुल सत्तार यांच्याकडील कृषी खातं राष्ट्रवादीला देण्यात आलं आहे. त्यामुळे सत्तार हे काय करणार? असा सवाल करण्यात येत आहे. सत्तार हे राजीनामा देणार की मंत्रिपदावर कायम राहणार? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अजितदादा तुपात
दरम्यान, अजित पवार यांच्या गटाला अत्यंत महत्त्वाचीच खाती मिळाली आहे. अर्थ, सहकार, कृषी, अल्पसंख्यांक, सामाजिक न्याय, अन्न व नागरी पुरवठा तसेच महिला व बालकल्याण आदी महत्त्वाची खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहेत. या खात्यातील अनेक खात्यांना स्वत:चा बजेट आहे. शिवाय यातील काही खाती तर थेट जनतेशी संबंधित आहेत. त्यामुळे पक्ष वाढवण्यासाठी या खात्याचा अजित पवार गटाला चांगलाच फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.