राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल सर्वात मोठी बातमी, शरद पवार गटाची मोठी खेळी
 
  निवडणूक आयोगाची सुनावणी सुरु होण्याआधीच मोठं पाऊल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नाव कुणाचं?
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा किंवा राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह कुणाचं? या प्रकरणावर आज केंद्रीय निवडणूक आयोगात पहिल्यांदाच प्रत्यक्ष सुनावणी पार पडत आहे. या प्रत्यक्ष सुनावणीच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाने मोठी राजकीय रणनीती आखली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील आमदारांना अडचणीत आणण्यासाठी शरद पवार यांच्या गटाने मोठी खेळी खेळली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट कोर्टात याचिका दाखल केलीय. त्यामुळे आगामी काळात अजित पवार गटाच्या आमदारांच्या अडचणी वाढ होते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. या याचिकेत त्यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणी आगामी काळात घडणाऱ्या घडामोडी अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहेत.
नेमकं प्रकरण काय?
अजित पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांना राष्ट्रवादीच्या जवळपास 40 आमदारांनी पाठिंबा दिल्याचा दावा केला जातोय. संबंधित प्रकरणी शरद पवार यांच्या गटाकडून जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल करण्यात आली. जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली.
अजित पवार यांनी घेतलेला निर्णय हा पक्षाच्या विरोधात आहे. त्यामुळे पक्षबंदी कायद्यानुसार अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी याचिका जयंत पाटील यांनी दाखल केली. पण त्यांच्या या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घेतली नाही. विधानसभा अध्यक्षांनी याप्रकरणी आतापर्यंत कोणतीही कारवाई केली नसल्याने जयंत पाटील यांनी आता थेट सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं होतं.
ठाकरे गटाने देखील हेच पाऊल उचललं होतं. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना एक आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते. तसेत सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता शरद पवार गटाच्या याचिकेवर कोर्टात काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेची दखल घेऊन सुप्रीम कोर्ट या प्रकरणी नेमकी कधी सुनावणी घेतं ते पाहणं महत्त्वाचं आहे. पण ठाकरे गटासारख्याच शरद पवार गटाच्या याचिकेवरही आता सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.