नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात भाजपचा अविश्वास प्रस्ताव झाला 'गले की हड्डी', विरोधक झाले आक्रमक
मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. भाजपने आणलेल्या प्रस्तावावरुन सत्ताधारी आडचणीत आले. हा प्रस्ताव विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांच्यासंदर्भातील होता. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात भाजपने आणलेला अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी महाविकास आघाडी आग्रही होती. यासाठी महाविकास आघाडीने राज्यापालांची भेट घेतली. त्यामुळे कमी संख्या असताना सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्यात महाविकास आघाडी यशस्वी झाली.
काय आहे प्रकार
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. नीलम गोऱ्हे या पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोप करत त्यांनी हा अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यावेळी नीलम गोऱ्हे ठाकरे गटासोबत होत्या. परंतु आता त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात दाखल अविश्वास ठराव मागे घ्यावा असा प्रस्ताव दरेकर यांनी मांडला आहे.
महाविकास आघाडी आक्रमक
डॉ. नीलम गोऱ्हे, प्रा. मनिषा कायंदे आणि विप्लव बजोरिया विधान परिषदेतील हे तीन आमदार आता शिंदे गटासोबत आहे. परंतु गोऱ्हे या उपसभापती आहेत. त्यांनी पक्षांतर केले आहे. यामुळे त्या संवैधानिक पदावर राहू शकत नाही, त्यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी महाविकास आघाडीने केली. त्यासाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आक्रमक झाले.