मंत्रिमंडळाची बैठक सुरू, पण अर्धा डझन मंत्र्यांची दांडी; कारण काय?
 
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला अर्ध्या डझनहून अधिक मंत्र्यांनी दांडी मारली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मंत्र्यांनी कॅबिनेटच्या बैठकीला दांडी मारली आहे. दिवाळीच्या सुट्टीमुळे मंत्री अजूनही मंत्रालयाकडे आले नाहीत. त्यामुळेच ते बैठकीला आले नसल्याचं सांगितलं जात आहे.
आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला 18 मंत्री उपस्थित असून 11 मंत्र्यांनी दांडी मारली आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे जालन्यात ओबीसी रॅलीला उपस्थित आहेत. त्यामुळे ते कॅबिनेटच्या बैठकीला येऊ शकले नाहीत. तर इतर मंत्री दिवाळी निमित्ताने अजूनही आपल्या मतदारसंघात आहेत. त्यामुळे त्यांनाही बैठकीला येता आलं नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.
आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात दुष्काळाचा तिसरा टप्पा जाहीर होण्याची शक्यता आहे. दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची 29 नोव्हेंबरला महत्त्वाची बैठक आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त तालुके मोठ्यासंख्येने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आज महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद 2023 चा अहवाल कॅबिनेट समोर सादर केला जाणार आहे. त्यापार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकी आधी अजित पवारांनी सर्व संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
अजितदादांची प्री कॅबिनेट मिटिंग
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात कॅबिनेट आधीच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. सकाळी 9 वाजता मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर अजित पवारांची प्री कॅबिनेट मिटिंग झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे मंत्री आले नव्हते. दिलीप वळसे पाटील आणि धनंजय मुंडे वेळेत आले. बाकीचे मंत्री दीड तास उलटला तरी आले नव्हते.
दांडी मारणारे मंत्री
छगन भुजबळ अदिती तटकरे हसन मुश्रीफ अनिल पाटील अब्दुल सत्तार संजय राठोड शंभूराज देसाई उदय सामंत अतुल सावे सुरेश खाडे राधाकृष्ण विखे पाटील रवींद्र चव्हाण
धर्मरावबाबा आत्राम संजय कुमार बनसोडे संदीपान भुमरे गुलाबराव पाटील
कॅबिनेटला हजर मंत्री
एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार दिलीप वळसे पाटील धनंजय मुंडे दादा भुसे तानाजी सावंत विजयकुमार गावीत चंद्रकांत पाटील दीपक केसरकर मंगलप्रभात लोढा सुधीर मुनगंटीवार