मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्यात कोल्ड वॉर, अधिकार क्षेत्रात ढवळाढवळ; काय आहे प्रकरण?
मुंबई   : मी नगरविकास खात्याचा मंत्री असताना दादा तुम्ही माझ्या खात्याच्या परस्पर बैठका घ्यायचात. माझ्या परस्पर या बैठकी व्हायच्या. तेव्हा मी काही तुम्हाला कधी बोललो?, असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजितदादांची विधानसभेतच पोलखोल केली होती. मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच विधानसभेत बोलत असताना शिंदे यांनी हा दावा केला होता. त्यावेळी अजितदादा विरोधी पक्षनेते होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे सरकारमधील काळातील हा किस्सा ऐकवताना आपली वेदनाही बोलून दाखवली होती. आता अजितदादा शिंदे सरकारमध्ये सामील झाले असून त्यांनी पुन्हा एकदा शिंदे यांच्या खात्यात ढवळाढवळ सुरू केली आहे. खुद्द राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्याचा गौप्यस्फोट केला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला. खात्याचा संबंध नसताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वॉर रूममध्ये राज्यातील प्रोजेक्टचा आढावा घेतला. त्यामध्ये मुख्यमंत्री अध्यक्ष असतात. त्याचा फायनान्स विभागाचा काही संबंध नसतो. म्हणजे वॉररूममध्ये कोल्डवार सुरू झाला आहे. तो कोल्ड वॉर कुठल्या दिशेने गेलाय हे कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहिलं असेल, असा गौप्यस्फोट विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकारक्षेत्रातील बाबींवर बैठक घेतल्याची चर्चा आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नियंत्रणाखालील राज्यातील प्रकल्पांसाठीच्या वॉर रुममध्ये अजित पवारांनी बैठक घेतल्याचा वडेट्टीवार यांनी दावा केलाय.प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटच्या माध्यमातून अजितदादांनी बैठक घेतली. मात्र वॉर रुमचे सदस्य सचिव राधेश्याम मोपलवारांना बैठकीतून डावलल्याची चर्चा आहे.अजितदादा यांनी राधेश्याम मोपलवार यांना बैठकीचा निरोपच दिला नसल्याचं सांगितलं जात आहे.
सत्ताधारी काय म्हणातात
दरम्यान, सत्ताधारी पक्षातून या कोल्ड वॉरवरून सारवासारव सुरू केली आहे. विजय वडेट्टीवार सध्या राज्याचे नवीन विरोधी पक्षनेते बनलेले आहेत. त्यामुळे आपलं वजन बनवण्याकरता दुसऱ्यांवर त्यांना टीका करावीच लागते. पूर्वी महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना फोन करत नव्हते. परंतु आत्ताच्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूममध्ये उपमुख्यमंत्री बैठका घेऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवताना पाहायला मिळत आहेत, असं आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
कोल्ड वॉर नाही
राज्यात कोणतंही कोल्ड वॉर नाही. असा कुठलाही कोल्ड वॉर नाही. राज्याच्या विकासासाठी तीन पक्ष एकत्रित काम करत आहेत. आम्ही आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढणार आहोत. त्यासाठी कमिटी स्थापन करून जागावाटप आणि इतर चर्चा होईल, असं शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितलं.