देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2024 नंतर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री, पण त्यांचे निकटवर्तीय म्हणतात...
*देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2024 नंतर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री, पण त्यांचे निकटवर्तीय म्हणतात...*
 
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातून मोठं बंड पुकारलं आणि त्यानंतर राज्यात सत्तांतर घडून आलं. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनले. महाविकास आघाडीत मंत्री असलेले अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये विरोधी पक्षनेते बनले. पण त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि अजित पवार सत्ताधारी पक्षाच्या युतीतले प्रमुख घटक बनले. ते राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री बनले. या सर्व घडामोडींनंतर आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे.
राज्याच्या राजकारणात आता नवी पहाट होणार आहे. ही पहाट म्हणजे देशातील आगामी काळातील लोकसभा निवडणूक. त्यानंतर राज्यात असणारी विधानसभा निवडणूक. या निवडणुकांसाठी राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आलाय. प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. प्रत्येकाला आगामी निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा जिंकून राजकारणात मोठं अस्तित्व निर्माण करायचं आहे. त्यासाठी घडामोडी सुरु झाल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री’
पुढच्या वर्षी असणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, यावरुन सत्ताधारी पक्षांकडून दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी अनेकवेळा आगामी विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील, असं सांगितलं आहे. तसेच 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितलं आहे. असं असताना भाजप आमदार प्रसाद लाड यांनी वेगळं वक्तव्य केलं आहे.
प्रसाद लाड म्हणतात, ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार’
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आज मधामाशी बोलताना सांगितल की  “निश्चितपणे यात काही शंका नाहीय. बाप्पाने निश्चितच केलंय. 2024 नाही, तर 2034 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार या देशात राहील. राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात पुन्हा एकदा सरकार स्थापन होईल आणि देवेंद्र फडणवीस आमचे मुख्यमंत्री होतील”, असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं.
संजय शिरसाट म्हणाले…
प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं. “प्रसाद लाड हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यांनी त्यांच्या नेत्याचं नाव घेणं काही गैर नाही. आम्हालाही वाटतं की, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. अजित पवार यांच्या गटाला वाटतं की, अजित पवार मुख्यमंत्री होतील”, असं संजय शिरसाट म्हणाले.
राजकारणात प्रत्येक पक्षाचा जो कार्यकर्ता असतो, त्याला निश्चितच असं वाटत असतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. त्यामुळे प्रसाद लाड यांच्या म्हणण्यानुसार आमचंही म्हणणं आहे की, एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने काम करत आहेत, पुढील वेळेला तेच मुख्यमंत्री राहावेत, अशी आमची इच्छा आहे”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.