मला तोंड उघडायला लावू नका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा
 
अजितदादा सत्तेत आल्यामुळे काही शंका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान
मुंबई   : अजितदादा सत्तेत आल्यामुळे काही शंका आहेत, पण हे बेरजेचे राजकारण आहे. ही वैचारिक युती आहे. त्यामुळे चिंता करू नका. पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे. त्यामुळे शिवसैनिकांच्या एक केसाला धक्का लागू देणार नाहीय तुम्ही सुद्धा एकनाथ शिंदे बनून काम करा, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. कोल्हापुरात शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली.
अजित पवार आल्यावर आपलं कसं होणार असं तुम्हाला वाटलं असेल. काही गणितं करावे लागतात. पण गणितं करत असताना आपल्यावर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही. तुमची काळजी करणारा मुख्यमंत्री तिकडे बसला आहे. कारण मी घरात बसत नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला.
अहंकार, इगो कशाला हवा?
2019 ला बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला तुम्ही तिलांजली दिली. आता आपली वैचारिक युती झाली आहे. जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा एकनाथ शिंदे जन्म घेतो, असं देवेंद्र फडणवीसही म्हणाले आहेत, असं सांगतानाच केंद्राकडून मदत मागायला कशाला अहंकार, इगो पाहिजे?, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता केला.
फडणवीस युती धर्मातला निष्कलंक माणूस
मुंबई महानगरपालिकेत भाजपचं वर्चस्व होतं. भाजपचा महापौर बसवण्याची सर्व तयारी झाली होती. पण आमच्या नेत्याचा जीव महापालिकेत अडकला होता. जसा पोपटाचा जीव अडकलेला असतो तसा. त्यामुळे भाजपने शिवसेनेला महापौरपद दिलं. देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक वेळी दोन पावलं मागे घेतली. ज्याच्यासाठी मुंबई महानगरपालिका सोडली त्याने 2019 ला काय केलं? माणसाने जाणीव तर ठेवलीच नाही पण कृतघ्नपणा केला. कुणाला कोणी कलंक म्हणताय?. युती धर्म पाळण्याचे काम देवेंद्र फडणवीसनी केलं. देवेंद्र फडणवीस हा युती धर्मातला निष्कलंक माणूस कलंकितपणा तुम्ही केला, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
 
बोलायला लावण्याची वेळ येऊ देऊ नका
2019 ला कोणतीही कूटनीती केली नसताना तुम्ही झूटनीतीचा वापर केला. एकनाथ शिंदेला उपमुख्यमंत्री पद द्यावे लागेल म्हणून सरकारमध्ये गेले नाहीत. एकनाथ शिंदेला मोठे करायचं नाही, त्याला द्यायचं नाही म्हणून हे सगळं केलं. हे माझ्यावर गुदरलेले प्रसंग आहेत. मला बोलायला लावण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका. सत्तेसाठी खुर्चीसाठी कधीही तडजोड केली जाणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.
 
400 निर्णय घेतले
बाळासाहेबांची हिंदुत्वाची भूमिका घेऊन आपण वर्षभरापूर्वी सरकार स्थापन केलं. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा बाळासाहेबांचा मूलमंत्र होता. सामान्य लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी आपलं सरकार काम करतंय. आजपर्यंतच्या कॅबिनेटमध्ये घेतलेले निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे आहेत. वर्षभरात साडेतीनशे ते चारशे निर्णय आम्ही घेतले. विरोधी पक्षाला आता बोलायला काही शिल्लक राहिलेले नाही, असंही ते म्हणाले.
त्यांचा ज्योतिषी कोण?
अर्थसंकल्प चांगला आहे, पण त्यासाठी पैसे कुठून आणणार? असं विरोधक म्हणाले. याचाच अर्थ त्यांना अर्थसंकल्पावर टीका करता आली नाही. पंचामृत लोटा भरून प्यायचं नसतं मात्र हे विरोधकांना कळणार कधी? सरकार पडेल असं गेले एक वर्षापासून आपण ऐकलं. पण दिवसेंदिवस हे सरकार भक्कम होत गेलं. त्यांचा ज्योतिषी कोण होता माहिती नाही, पण अजूनही म्हणतात सरकार पडणार, असा टोला त्यांनी लगावला.
त्यांचीच बोट फुटली
राजकारणात काही बेरजेची समीकरणे असतात. मोदी चांगलं काम करत आहेत म्हणूनच अजितदादा सोबत आलेत. डबल इंजिनचं सरकार वर्षभरापासून काम करत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची माती सरकली आहे. त्यांना धडकी भरली आहे. मोदींच्या विरोधात विरोधी पक्ष बैठक घेत आहेत. जे विरोधकांची मोट बांधत होते त्यांचीच बोट फुटली आहे. एकत्र येऊन सुद्धा एका नेत्याचं नाव ते ठरवू शकत नाहीत. यातच नरेंद्र मोदींचा विजय पक्का आहे, असंही ते म्हणाले.