महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंपाचे संकेत,बड्या नेत्याचा सर्वात मोठा दावा

 
मुंबई: विधी मंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी देखील घेत आहेत. आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर येत्या 31 डिसेंबपर्यंत निकाल येणं अपेक्षित आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या नेत्यांची फेरसाक्ष नोंदवण्याचं काम आता जवळपास अंतिम मार्गावर आहे. असं असताना राजकीय वर्तुळात आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतंच याबाबत मोठा दावा केला होता. “विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संविधानानुसार निर्णय घेतला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र होतील. तसेच राहुल नार्वेकर हे सुद्धा अध्यक्षपदाचा राजीनाना देतील”, असं रोहित पवार म्हणाले होते. त्यानंतर आता काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी मोठा दावा केला आहे.
हे या वर्षांचं अखेरचं हिवाळी अधिवेशन आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यासोबत फोटोसेशन झालं. या फोटोसेशन नंतर जो तो लॉबिंग करू लागलाय. लॉबिंग यासाठी कारण सगळ्या आमदारांना वाटत आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डिसक्वॉलिफाय होतील. आमदार अपात्रतेत ते बाद झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील. त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांना आणि सत्ताधारी विरोधकांना डोळे मारत होते”, असा धक्कादायक दावा कैलास गोरंट्याल यांनी केला.
‘आपलेच दात आपलेच ओठ’
“आता तुम्ही पाहा की ज्या पानवाला , रिक्षावाला, हमाल आणि इतरांना ठाकरे गटाचे प्रमुख ऊद्धव ठाकरेंनी आमदार केलं ते आता पुन्हा येणार नाहीत. त्यांना जनता मातीत गाडेल. आपलेच दात आपलेच ओठ असा प्रकार सध्या झालाय”, असं कैलास गोरंट्याल म्हणाले आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार?
महाराष्ट्राचं राजकारण आता महत्त्वाच्या टप्प्यावर आलं आहे. शिवेसना आमदार अपात्रतेचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तर सध्याचं सरकार पुढच्या सहा ते दहा महिन्यांपर्यंतचा कार्यकाळ पूर्ण करेल. पण निकाल एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लागला तर महाराष्ट्राच्या राजकारणात खरंच खूप मोठ्या हालचाली घडण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार अपात्र ठरले तर कदाचित कैलास गोरंट्याल यांनी सांगितल्यानुसार अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात. तसेच शिंदेंना जसा धक्का बसला तसाच आमदार अपात्रतेच्या प्रकरणात अजित पवारांना धक्का बसला तर हे सरकारच बरखास्त होऊ शकतं. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होऊ शकतात, अशी चर्चा आहे. अर्थात या सगळ्या शक्यता आहेत. खरं काय होईल ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.