फडणवीस सरकारची मोठी घोषणा : नागरिक सेवा होणार WhatsApp वर उपलब्ध

-“WhatsApp वर मिळणार १,००० पेक्षा जास्त शासकीय सेवा!”
-”‘आपले सरकार’ पोर्टलनंतर आता WhatsApp वरही सर्व सेवा”
-“शासकीय कामे होतील फक्त एका मेसेजवर!”
-“WhatsApp वरून मिळणार जन्म, मृत्यू, दाखले ते विविध प्रमाणपत्रे”
मुंबई, एपीएमसी न्यूज नेटवर्क: 
महाराष्ट्रातील सर्व शासकीय सेवा नागरिकांच्या अगदी बोटांच्या टोकावर पोहोचणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (२५ ऑगस्ट) अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, ‘आपले सरकार’ पोर्टलसोबतच सर्व नागरिक सेवांचा लाभ WhatsApp वरही उपलब्ध करून द्यावा.
‘वर्षा’ निवासस्थानी नागरिक सेवांच्या आढावा बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, प्रत्येक तालुक्यात १० ते १२ गावांचा क्लस्टर तयार करून स्थानिक गरजेनुसार सेवा द्याव्यात व त्या क्लस्टरचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र टीम असावी.
मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश
• अर्ज प्रक्रियेत लागणारी कागदपत्रे कमी करावीत
• तृतीय पक्ष संस्थामार्फत सेवांची गुणवत्ता तपासणी व्हावी
• जिल्हा परिषद, महापालिका आणि विद्यापीठांच्या डॅशबोर्डचे मानकीकरण करावे
• सेवांची वितरण प्रणाली ईमेल, पोर्टल आणि WhatsApp अशा मल्टिमोडल पद्धतीने करावी
मुख्यमंत्री कार्यालयाच्या (CMO) माहितीनुसार, ‘आपले सरकार’ पोर्टलवरील १,००१ पैकी ९९७ सेवा नागरिकांना उपलब्ध झाल्या असून, फक्त १५ दिवसांत तब्बल २३६ नवीन सेवा यात समाविष्ट झाल्या आहेत.
या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ अधिक सोपा, पारदर्शक आणि वेगवान पद्धतीने मिळणार आहे.