फडणवीसांची गुप्त भेट गेमचेंजर मनसे-भाजप जवळ येण्याची इनसाईड स्टोरी
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घडामोडी दिल्लीत सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेट घेणार आहेत. भाजपचे महासचिव विनोद तावडे सध्या राज यांच्यासोबत आहेत. त्यामुळे महायुतीत लवकरच मनसेचा समावेश होऊ शकतो. तसं घडल्यास महायुतीला चौथा भिडू मिळेल.
लोकसभा निवडणुकीत भाजपकडून मनसेला एक किंवा दोन जागा सोडण्यात येतील. मनसेला दक्षिण मुंबईची जागा दिली जाऊ शकते. तिथून माजी आमदार बाळा नांदगावकर यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. भाजपच्या चिन्हावर उमेदवार उभे करा, असा प्रस्ताव भाजपकडून मनसेला देण्यात आला होता. पण राज यांनी ही अट अमान्य केली. माझे उमेदवार इंजिन चिन्हावरच लढतील अशी ठाम भूमिका राज यांनी घेतली. ती भाजपनं मान्य केली.
मनसे-भाजप जवळ येण्याची इनसाईड स्टोरी
मागील काही महिन्यांपासून राज यांच्या भूमिका महायुतीसाठी पूरक होत्या. राजकडून केलेल्या मागण्या महायुती सरकारनं मान्य केल्या. त्यामुळे राज ठाकरे महायुती सरकारच्या अधिकाधिक जवळ येत गेले. गेल्या महिन्यात मनसे आणि भाजप नेत्यांच्या बैठका सातत्यानं सुरू होत्या. त्यातून संभाव्य युतीची बोलणी सुरू होती.
८ फेब्रुवारीला मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले होते. त्यावेळी भाजप-मनसे युतीच्या चर्चांना उधाण आलं. त्यानंतर १९ फेब्रुवारीला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार राज यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर पोहोचले. शेलार आणि राज यांच्यामध्ये चर्चा झाली.
फडणवीसांची गुप्त भेट गेमचेंजर?
मागील आठवड्यात राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत एक गुप्त भेट झाली. या भेटीत फडणवीसांनी राजकीय गणितं आणि समीकरणं मांडली. मनसेसोबत युती करण्यासंदर्भात पक्षश्रेष्ठींची भूमिका त्यांनी विषद केली. यानंतर राज यांनी त्यांची भूमिका मांडली. दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झालं. याची माहिती फडणवीसांनी दिल्लीला कळवली. भाजप नेतृत्त्वानं हिरवा कंदिल दिला. त्यानंतर राज यांना फोन करुन दिल्लीला बोलावण्यात आलं.