महायुतीला पहिला धक्का, मंत्री राहिलेला नेता युतीतून बाहेर - स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा
पुढील वर्षी 2024मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपला रोखण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. तर इंडिया आघाडीला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने एनडीएचं पुनरुज्जीवन केलं आहे. तर महाराष्ट्रात भाजपने शिंदे गट आणि अजितदादा गटाला सोबत घेऊन महायुती मजबूत केली आहे. एवढेच नव्हे तर या दोन्ही गटाला सोबत घेऊन भाजपने राज्यात सत्ताही स्थापन केली आहे. त्यामुळे महायुती राज्यातील महाविकास आघाडीला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत टक्कर देणार असल्याची जोरदार चर्चा रंगलेली असतानाच महायुतीला एक मोठा धक्का बसला आहे. महायुतीच्या घटक पक्षाने महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या पक्षाने स्वबळावर निवडणुका लढणार असल्याची घोषणाही केली आहे.
महादेव जानकर यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. युती सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्रीही होते. जानकर यांचा रासप हा महायुतीचा घटक पक्ष आहे. पण जानकर यांनी आता युतीतून बाहेर पडत असल्याचा निर्णय जाहीर करून महायुतीला पहिला धक्का दिला आहे. जानकर यांच्या पक्षाचा राज्यातील अनेक जिल्ह्यात प्रभाव आहे. दलित आणि धनगर समाजामध्ये जानकर यांच्या पक्षाची पाळंमुळं खोल रुजलेली आहे. त्यामुळे जानकर यांच्या निर्णयाचा महायुतीला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कुणाच्याच कुबड्या नको
महादेव जानकर यांनी सध्या पक्ष बांधणी साठी महाराष्ट्रभर जनसुराज्य यात्रा सुरू केली आहे. ग्रामीण भागात या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहेत. आज सांगली शहरांमध्ये ही जनसुराज्य यात्रा दाखल झाली. यावेळी महादेव जानकर यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा करून आपण महायुतीशी फारकत घेतल्याचंच अप्रत्यक्ष जाहीर केलं आहे. कुणाच्याही कुबड्या न घेता राष्ट्रीय समाज पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा स्वतंत्र लढवणार आहे. न विकणारा समाज तयार झाला तर न विकणारा नेता तयार होतो. त्यासाठीच संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या रॅली चालू आहे, असं महादेव जानकर यांनी सांगितलं.
छोट्या पक्षांना चांगले दिवस
भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या बड्या पक्षांमध्ये विस्कळीतपणा सुरू आहे. त्यांच्या राजकारणाचा मतदारांना वीट आला आहे. मतदार हे सर्व पाहत आहे. त्यामुळे आगामी काळात छोट्या पक्षांना फायदा होणार आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती विचित्र झाल्याने छोट्या पक्षांनाही चांगले दिवस येणार आहेत. पर कुणाचं वाटुळं आणि कुणाचं चांगलं व्हावं असं म्हणण्याचा आम्हाला अधिकार सुद्धा नाही. मात्र राष्ट्रीय समाज पक्षाचं सरकार कसे येईल या भूमिकेतून आम्ही रॅली काढत आहोत, असं जानकर म्हणाले.
तेलंगना मॉडेल राबवा
शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. कांद्याचे आणि मक्याचे दर कोसळत आहेत. तेलंगणामध्ये शेतकऱ्यांसठी ज्या सवलती दिल्या जात आहेत. तशा योजना महाराष्ट्रामध्ये राबवा, या आशयाचे पत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.