शरद पवार गटाकडे किती आमदार?, विधानसभेत किती आमदारांनी लावली हजेरी? पुढे काय?
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर दोन्ही गटाने प्रचंड शक्तीप्रदर्शन केलं. दोन्ही गटाकडून आमच्याकडेच सर्वाधिक आमदार असल्याचा दावाही करण्यात आला. अजित पवार गटाने त्यांच्याकडे 40 आमदार असल्याचा दावा केला. तर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्याकडे 19 आमदारांचं बळ असल्याचा दावा केला होता. कालच जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीकडे 19 आमदार असल्याचा दावा केला होता. पण आज त्यांचा हा दावा फोल ठरल्याचं दिसून येत आहे.
विधीमंडळाचं अधिवेशन सुरू होताच उपमुख्यमंत्री अजित पवार विधिमंडळात आले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सर्व आमदारा होते. अजितदादांनी आपल्या आमदारांसोबत शक्तीप्रदर्शनही केलं. त्यानंतर ते सभागृहात निघून गेले. सभागृहात अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या आमदारांची बसण्याची वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली होती. अजितदादा गटाना अधिक जागा देण्यात आली होती. त्यांची आमदार संख्याही अधिक होती. मात्र, शरद पवार गटाच्या जागेवर फक्त आठच आमदार बसलेले होते. त्यामुळे शरद पवार गटाच्या मागे फक्त आठच आमदार आहेत का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
फक्त आठच आमदार
शरद पवार गटासाठी देण्यात आलेल्या जागेवर फक्त आठच आमदार बसलेले होते. जयंत पाटील, अनिल देशमुख, बाळासाहेब पाटील, प्राजक्त तनपुरे, राजेश टोपे, सुमन पाटील, सुनील भुसारा आणि रोहित पवार आदी आमदार शरद पवार गटाला दिलेल्या जागेवर बसलेले होते. जितेंद्र आव्हाड सभागृहात दिसले नाहीत. त्यांना पकडून राष्ट्रवादीच्या आमदारांचं संख्याबळ नऊ होतं. त्यामुळे इतर 10 आमदार गेले कुठे असा सवाल केला जात आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या एकूण 54 आहे. त्यापैकी 40 आमदार अजित पवार गटाकडे आहेत. तर नऊ आमदार शरद पवार गटाकडे आहेत. त्यामुळे या दोन्ही आमदारांची संख्या 49 होते. त्यामुळे इतर पाच आमदार कुणाच्या बाजूने आहेत? अशी चर्चा आता रंगली आहे.