मी शरद पवार साहेबांसोबत व पक्षासोबत ठाम
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुनील तटकरे यांचा विधिमंडळाच्या लॉबीतील फोटो सोमवारी प्रचंड व्हायरल झाला. यावर आपली भूमिका स्पष्ट करताना मी शरद पवार साहेबांसोबत व पक्षासोबत ठाम आहे. कोणीही गैरसमज निर्माण करू नका असे जयंत पाटील यांनी सांगितले.
खासदार सुनील तटकरे वेगळ्या पक्षात आहेत मी वेगळ्या पक्षात आहे. विधीमंडळात आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून एकमेकांना भेटू शकतो. आमचे व्यक्तीगत संबंध असू शकतात त्याचा राजकीय अर्थ काढण्याचे कोणतेच कारण नाही. माझे इतर पक्षातील अनेक नेत्यांशी चांगले संबंध आहे मात्र याचा वेगळा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. मी शरद पवार साहेबांसोबत ठाम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत ठाम आहे. पवार साहेब सांगतील तीच आमची दिशा आहे असे त्यांनी स्पष्ट केले. आता अजित पवारांसोबत गेलेले ६ आमदार हे माझ्या सोबत लॉबीत बसलेले होते. ३ आमदारांनी माझ्या सोबत जेवण केले. याचा अर्थ काही वेगळा होत नाही. त्यामुळे कोणीही गैरसमज निर्माण करु नका असेही त्यांनी सांगितले
दरम्यान, निधी वाटपात दुजाभाव झाल्याचे वृत काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते यावर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांच्या मतदारसंघात निधी वाटप झालेला दिसत आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा शहरी मतदारसंघ आहे त्यामुळे नगरविकास खात्यामार्फत त्यांना निधी मिळू शकतो.