1 भुजबळ पाडला तर 160 मराठे पाडू ओबीसी नेत्याचा मोठा इशारा
 
एपीएमसी न्यूज़ डेस्क: ओबीसी नेत्यांची पंढरपुरात एल्गार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मराठा नेते मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती. त्याच टीकेचा धागा पकडत प्रकाश शेंडगे यांनी मोठा इशारा दिला. “तुम्ही 1 भुजबळ पाडला, तर 160 मराठे पाडू. माझं हे वाक्य गड्यांना लयी लागलं. फोन करत्यात, आमचं नाव तुमच्या यादीत आहे का? इथे सोलापूरमध्ये एक-दोन सोडले, सगळे मराठे, खासदार, आमदार सगळे मराठे, जिल्हा परिषदेला सगळे मराठे. पण आता हे चालणार नाही. आता हे चालवायचं का? आता आमदारही आपला आणि खासदारही आपलाच. करायचा ना? यापुढचा माढ्याचा खासदार हा ओबीसीचाच निवडून येणार”, असं प्रकाश शेंडगे म्हणाले.
काठीनं घोगडं घेऊद्या की मलाही लोकसभेत पाठवा की रं… ओबीसींचा हा एल्गार संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. मराठा समाजाने आम्हाला ओबीसीतूच आरक्षण पाहिजे, अशी भूमिका घेतली. मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचं आरक्षण आहे. त्यातील 10 टक्क्यांपैकी साडेआठ टक्के आरक्षण आहे. तुम्हाला हॉस्टेल मिळालं, कर्ज मिळालं, सगळं मिळालं. तरीही मुंबईत येणारच, आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही. पण त्याआधी मुंबईत आम्ही जाणार. मुंबई आमची आहे. तिथे 50 लाख ओबीसी आहेत. सगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये आमचे भटके-विमुक्त आहेत. त्यांनी एकदिवस रजा काढली तर मुंबई सगळी पॅक करण्याची ताकद मुंबईतील ओबीसींमध्ये आहे”, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला.
‘हे म्हणतात की, 54 लाख नोंदी सापडल्या’
“इकडे मराठा समाजाने आंदोलन जाहीर केलं. त्यानंतर आम्ही बैठक घेतली. आपलंही 20 जानेवारीला मुंबईत आंदोलन सुरु असलं पाहिजे. आमचं म्हणणं आहे की, आमच्या आरक्षणाला धक्का लागायला नको. शासन म्हणतंय की तुम्हाला लेखी आश्वासन दिलं आहे. आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. हे म्हणतात की, 54 लाख नोंदी सापडल्या आहेत. या 54 लाख नोंदींच्या सगेसोयरे आणि रक्ताचे नाते धरले तर 3 ते 4 कोटी झाले. म्हणजे शंभर टक्के समाजाला कुणबी दाखले देवून ओबीसी आरक्षणात घातलं जात आहे”, असा दावा प्रकाश शेंडगे यांनी केला.