देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? - रोहित पवार असं का म्हणाले?
अजित पवार हे आज ना उद्या मुख्यमंत्री होतीलच, असं विधान राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काल केलं. त्यामुळे अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे सर्वच नेते अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याचं भाकीत करत आहेत. त्यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आलं आहे. त्यातच आता अजित पवार यांचे पुतणे आणि शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांनीही मोठं विधान केलं आहे. रोहित पवार यांच्या या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मी अजितदादांचा पुतण्या आहे. त्यामुळे अजितदादा जर राज्याचे मुख्यमंत्री झाले तर मला आनंदच होईल. परंतु, सामान्य नागरिक म्हणून मला ही गोष्ट पटणार नाही. जर अजितदादा महाविकास आघाडीमध्ये असते तर पुढचे पाच वर्ष तेच मुख्यमंत्री असते. परंतु सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये भांडण लावून दुसरे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्याचा हा प्रयत्न नाही ना? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.
त्यावर भाष्य नको
प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार आज ना उद्या मुख्यमंत्री होणार असं विधान केल्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्या नेतृत्वात काम सुरू आहे. कोणी काहीही म्हणो मी त्यावर भाष्य करणार नाही, असं राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.
10-15 वर्षानंतर अजितदादा मुख्यमंत्री
प्रफुल्ल पटेल काहीही बोलले असले तरी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच राहतील. प्रफुल्ल पटेल असे म्हणाले की, भविष्यामध्ये अजितदादा हे मुख्यमंत्री होतील. भविष्यात म्हटल्यावर 2024 पर्यंत मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच राहणार हे स्पष्ट आहे. 2024 च्या नंतरही पुढील दहा वर्षानंतर, पंधरा वर्षानंतर अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकतात, असा टोला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी लगावला.