Loksabha Election 2024
नवी दिल्ली : संसदेच हिवाळी अधिवेशन संपताच भाजपाने मिशन 2024 ची तयारी सुरु केलीय. लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाजपाने 22 आणि 23 डिसेंबरला दिल्लीतील पक्ष मुख्यालयात बैठक बोलावली आहे. देशातील सगळे प्रदेशाध्यक्ष, संघटन महामंत्री, राष्ट्रीय पदाधिकारी आणि सर्व मोर्चाचे अध्यक्ष सहभागी होतील. बैठकीनंतर संघटन महामंत्र्यांसोबत बैठक होईल. या दरम्यान ‘विकसित भारत संकल्प अभियान’ समीक्षा केली जाईल. त्याशिवाय बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत 325 जागा जिंकण्याची रणनिती ठरवली जाईल. विजयाची हॅट्रिक करुन इतिहास रचण्याचा भाजपाचा इरादा आहे.
भाजपाने 2024 साठी 325 प्लस सीट्सच टार्गेट ठेवलय. त्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी दोन दिवसांची बैठक बोलावली आहे. लोकसभा निवडणूक, विकसित भारत संकल्प अभियान, विधानसभा निवडणूक समीक्षेसह अनेक मुद्यांवर चर्चा होईल. जे.पी. नड्डा बैठकीच अध्यक्षपद भूषवतील.
2019 मध्ये किती जागा जिंकलेल्या?
पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपाचा कमालीचा आत्मविश्वास उंचावला आहे. मध्य प्रदेशात भाजपा सत्ता टिकवण्यात यशस्वी ठरली. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला हरवून सत्ता मिळवली. भाजपाने 2024 साठी 325 प्लस सीट्सच टार्गेट ठेवलय. 2019 मध्ये भाजपाने 303 जागा जिंकल्या होत्या. मिशन 2024 फत्ते करण्यासाठी पंतप्रधान मोदींपासून अमित शाहंचे दौरे सुरु झालेत.
किती कोटी मतदार मिळवण्याच टार्गेट?
लोकसभा निवडणुकीसाठी जेपी नड्डा यांनी 35 कोटी मतदारांच टार्गेट सेट केलय. 2019 मध्ये भाजपाला 22 कोटी मत मिळाली होती. फक्त बोलायच म्हणून टार्गेट नाहीय,आधीपासून जिल्हा कार्यालयात 300 पेक्षा जास्त कॉल सेंटर कार्यरत आहेत. जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि आमदार जनसंर्पक वाढवतायत.
कॉल सेंटर कुठे आहेत ?
बहुतांश कॉल सेंटर जिल्हा पार्टी कार्यालयात आहेत. त्या माध्यमातून 50 लाख लोकांना जोडण्याच टार्गेट आहे. पक्षासाठी सक्रीय योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा शोध सुरु आहे. याच कॉल सेंटरच्या माध्यमातून सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश आहे. लाभार्थी सूचीमध्ये आणखी 70 लाख लोकांना जोडण्याच टार्गेट आहे.