NCP MLA Disqualification case : 'तुम्हाला अपात्र का करु नये?', अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा सवाल
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणात सोमवारी झालेल्या सुनावणीत अजित पवार (Ajit Pawar) गटाला मोठा धक्का बसला.   तुम्हाला अपात्र का करु नये? असा सवाल सुप्रीम कोर्टानं अजित पवार आणि त्यांच्या 41 आमदारांना विचारला आहे. कोर्टानं या सर्वांना तशी नोटीस बजावलीय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील आमदारांना पात्र ठरवलं होतं. राष्ट्रवादी प्रमाणेच शिवसेनेच्या फुटीर आमदारांच्या प्रकरणातही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावरील सुनावणीच्या दरम्यान कोर्टानं ही नोटीस बजावली.   शिवसेना आमदारांवरील सुनावणीबरोबरच राष्ट्रवादीचे प्रकरण सुनावणीसाठी येईल, असं कोर्टानं स्पष्ट केलं.
अशी मागणी करणारी याचिका उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणावर 3 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्याच दिवशी राष्ट्रवादीच्या आमदारांवरील प्रकरणाचीही सुनावणी होईल. सुप्रीम कोर्टानं या सुनावणीपूर्वी अजित पवार आणि त्यांच्या 41 आमदारांना नोटीस बजावली आहे.
राज्य विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. त्यापूर्वी आमदार अपात्रता प्रकरणात निर्णय व्हावा अशी मागणी शरद पवार गटाची आहे. तर या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्यानं नोटीस बजावू नये, अशी मागणी अजित पवार गटानं केली होती. पण, सुप्रीम कोर्टानं ही मागणी फेटाळत नोटीस बजावली आहे.