आता मुंबईतील मोर्चा रद्द करा, अजित पवारांचं विधान, एकनाथ शिंदे लगेच म्हणाले, झेंडा नाही..., पत्रकार परिषदेत पिकला हशा

 
मुंबई: इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्र आणि हिंदी सक्तीचा शासन निर्णय राज्य सरकारने रद्द केला. मात्र पाच जुलैला विजयी मोर्चा किंवा सभा करण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा विचार आहे. 5 जुलैला विरोधकांचा विजयी मोर्चा निघेल असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल (29 जून) मातोश्री येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. विजयी मोर्चासाठी पक्षाच्या नेत्यांबरोबरच मनसे, अन्य पक्ष आणि इतर संस्थांशी चर्चा करणार असल्याचंही सांगितलं. त्यामुळे आता राज ठाकरेंनी यासंदर्भात आज नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत 5 जुलैच्या सभेत सामील व्हायचं की नाही, याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र मुंबईतील 5 जुलैचा मोर्चा आता रद्द करावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (अजित पवार) यांनी केलं.
मराठी माणसाला वेठीस धरुन आता काही मोर्चा काढू नका, असं अजित पवार म्हणाले. तसेच आता मुंबईतील मोर्चा रद्द करुन टाका, असं आवाहन देखील अजित पवारांनी ठाकरे बंधूंना केलं. ज्या कारणासाठी हा मोर्चा काढण्यात येणार होता, मात्र तोच निर्णय सरकारने रद्द केला. त्यामुळे मोर्चा काढण्याचा आता प्रश्नच उरत नाही, असं अजित पवारांनी सांगितले. यासोबतच मोर्चात हा आला का, तो गेला का?, उगाच तुम्हाला (पत्रकारांना) त्रास...मोर्चात झेंडा नाही काही नाही..., असं विधान अजित पवारांनी केलं. अजित पवारांच्या या विधानावर पत्रकार परिषदेत बाजूला बसलेले एकनाथ शिंदे लगेच झेंडा नाही, त्यामुळे माणसं कळणार नाही..कोणती आहेत ती..., असं एकनाथ शिंदे म्हणाले. यावर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.
राज ठाकरे म्हणाले होते, मोर्चात कोणता राजकीय झेंडा असणार नाही-
मुंबईतील 5 जुलैच्या मोर्चात सर्व राजकीय पक्षांनी समील व्हावे, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं. तसेच मोर्चात कोणताही राजकीय झेंडा असणार नाही, फक्त मराठीचा अजेंडा असेल, असं राज ठाकरे म्हणाले होते.