धनंजय मुंडेंसोबतच्या बैठकीनंतर पियुष गोयल यांची कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
नईदिल्ली: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा   केली आहे. कांदा निर्यातीवर शुल्क वाढ केल्याने महाराष्ट्रात शेतकरी आक्रमक झाले आहेत. नाशिक, पुणे, अहमदनगर येथे शेतकऱ्यांच आंदोलन सुरु आहे. दरम्यान या विषयावर राज्य सरकारमधील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. या भेटीनंतर केंद्र सरकारकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.
केंद्र सरकार नाफेड मार्फत दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे . 2410 रुपये प्रतिक्विंटल भावाने ही कांदा खरेदी करण्यात येईल. धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली.
धनंजय मुंडेंसोबत जुन्नरचे आमदार राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. त्यावेळी जून्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके त्यांच्यासोबत होते. कांदा प्रश्नाच्या भेटीसाठी अतुल बेनके दिल्लीत आले होते.
60 ते 70 कोटींची उलाढाल ठप्प
कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने 40 टक्के शुल्क आकारलं आहे. त्याविरोधात महाराष्ट्रातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. नाशिकमधील लासलगाव ही कांद्याची मुख्य बाजारपेठ आहे. आज लासलगावसह जिल्ह्यातील प्रमुख 15 बाजार समित्यांमध्ये कांदा लिलावाचे कामकाज बंद राहणार आहे. कडकडीत बंद पाळण्यात येईल. दुसऱ्या दिवशीही कांदा लिलाव बंद राहिल्यामुळे 60 ते 70 कोटींची उलाढाल ठप्प राहणार आहे.
शेतकऱ्यांच्या कांदा चाळीत कांदा खराब होण्याची भीती आहे. शेतकऱ्यांकडून कांदा निवडण्याचं काम सुरू आहे. बाजार समित्या बंद राहिल्यास राहिलेला माल देखील खराब होण्याची भीती आहे.