Raj Thackeray | राज ठाकरे लोकसभेच्या रणांगणातून मागे हटण्याच्या विचारात का? आज सूचक विधान
 
-मनसेच्या सभेला गर्दी जमते. पण ती मतांमध्ये परावर्तित होत नाही. लोकसभा निवडणुकीत मनसेला किती जागांवर यश मिळेल? हे खात्रीलायक रित्या सांगता येत नाही. त्यात आता लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात राज ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केलय.
 
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. जागा वाटपाची चर्चा, दौरे बैठका यांचं सत्र सुरु आहे. प्रत्येक पक्ष त्या-त्या मतदारसंघात आपल्या ताकदीचा आढावा घेऊन मतदारसंघावर दावा करत आहेत. देशात NDA विरुद्ध INDIA तर महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. महाराष्ट्रातील या दोन्ही प्रमुख आघाड्यांच जागा वाटप अजून झालेलं नाही. आज होईल, उद्या होईल म्हणून अजून जागा वाटप रखडलेलंच आहे. कारण कुठल्या पक्षाच्या वाट्याला किती जागा येणार? यावरुन तिढा सुटतच नाहीय. कारण कुठलाही पक्ष सहजासहजी मागे हटायला तयार नाहीय.
आपल्या पदरात जास्तीत जास्त जागा पडाव्यात, हाच प्रत्येक पक्षाचा प्रयत्न आहे. कारण सर्वच पक्षांसाठी हा प्रतिष्ठा आणि कार्यकर्त्यांच्या भावनेचा विषय आहे. त्यामुळे सन्मानजक जागावाटप करताना दिग्गज नेत्यांची कसोटी लागणार आहे. दरम्यान महाराष्ट्रात सध्यातरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकला चलो रे च्या भूमिकेत आहे. ते महाविकास आघाडी किंवा महायुतीसोबत गेलेले नाहीत. मागच्या काही महिन्यांपासून याच लोकसभा निवडणुकीच्या चाचपणीसाठी राज ठाकरे नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे भागाचा दौरा करत होते. कारण शहरी भागात मनसेचा जनाधार आहे. सध्या विधानसभेत मनसेचा फक्त एक आमदार आहे. मनसेच्या सभेला गर्दी जमते. पण ती मतांमध्ये परावर्तित होत नाही. लोकसभा निवडणुकीत मनसेला किती जागांवर यश मिळेल? हे खात्रीलायक रित्या सांगता येत नाही. त्याता आता लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात राज ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केलय.
राज ठाकरे काय म्हणाले?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचा आढावा घेतला. दादरच्या ब्राह्मण सेवा संघ हॉलमध्ये बैठक झाली. त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. लोकसभा निवडणूक लढवायची की नाही ते येत्या 3 ते 4 दिवसात स्पष्ट करीन असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. याआधी 2014 साली मनसेने भाजपा विरोधात लोकसभेला उमेदवार दिले नव्हते. 2019 ला सुद्धा लोकसभेची निवडणूक लढवली नव्हती.