संभाजी भिडे आम्हाला गुरुजी वाटतात, तुम्हाला काय अडचण आहे? - देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत सवाल
मुंबई | शिवप्रतिष्ठानचे मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे यांच्या विधानाचे आजही विधानसभेत पडसाद उमटले. काँग्रेसच्या नेत्यांनी भिडे यांच्या विधानावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा हल्ला परतवून लावला. फडणवीस यांनी भिडे यांचा उल्लेख संभाजी भिडे गुरुजी असा केला. त्यातील गुरुजी या शब्दाला विरोधकांनी आक्षेप घेताच फडणवीस यांनी उलटा सवाल केला. संभाजी भिडे आम्हाला गुरुजी वाटतात. तुम्हाला काय अडचण आहे? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच भिडे गुरुजींनी महापुरुषांचा अवमान केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसारच वीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या शिदोरी या नियतकालिकावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संभाजी भिडे यांचा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित केला. मी स्थगन प्रस्ताव दिला होता. भिडे नावावर चर्चा करण्याची मागणी केली होती, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तुम्ही त्या दिवशीही स्थगन प्रस्ताव आणला होता. मी तुम्हाला थोडक्यात म्हणणं मांडण्याची संधी दिली होती. शुक्रवारी बोलल्यानंतर परत परत त्याच मुद्द्यावर बोलण्याची गरज नाही, असं सांगितलं. नाना पटोले यांनी नियम 23 वर सूचना दिली आहे. त्यावर मी निर्णय देतो. निर्णय दिल्यानंतर त्यावर चर्चा करण्याची गरज नाही, असं विधानसभा अध्यक्ष म्हणाले.
फडणवीस यांचं निवेदन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर निवेदन करणार असल्याचं सांगितलं. मी निवेदन करतो. संभाजी भिडे यांनी अमरावती येथे भाषण केलं होतं. त्यात त्यांनी आपल्या सहकाऱ्याला पुस्तक वाचायला लावले आणि त्यावर कमेंट करायला लावले आहेत. दोन पुस्तके. डॉ. एसके नारायणाचार्य आणि घोष यांची आहेत. ते काँग्रेसचे नेते आहेत. असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या पुस्तकातील मजकूर संभाजी भिडे यांनी आपल्या सहकाऱ्या मार्फत उद्धृत केला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काय अडचण आहे?
अमरावती राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 29 जुलै रोजी संभाजी भिडे गुरुजी आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. आम्हाला गुरुजी वाटतात. काय अडचण आहे? काय अडचण आहे. त्यांचं नाव भिडे गुरुजी आहे. संभाजी भिडे यांना सीआरपीसी 41 अ ची नोटीस पाठवली आहे. अमरावती पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधून नोटीस बजावली आहे. त्यांनी स्वीकारली आहे. त्यानुसार चौकशी होईल. अमरावतीतील व्हिडीओ नाही. जे माध्यमात फिरत आहे. ते वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आहेत. त्याचं सँपल घेऊन चौकशी केली जाणार आहे. जितेंद्र आव्हाड यांनीही तक्रार केली आहे. त्याची चौकशी केली जाणार आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
गुन्हा दाखल करू
कोणत्याही राष्ट्रीय पुरुषाच्या संदर्भात कोणीही अवामानजनक वक्तव्य केलं तर त्यांच्यावर केस फाईल होईल. त्यांच्यावर पोलीस कारवाई होईल. संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्वासाठी काम करतात. ते शिवाजी महाराजांशी त्यांच्या किल्ल्याशी बहुजन समाजाला जोडतात हे कार्य चांगलं आहे. पण तरीही त्यांना महापुरुषावर अशा प्रकारचं विधान करायचा अधिकार दिला नाही. त्यांनाच काय कुणालाही नाही.
त्यामुळे महापुरुषावर कुणीही अशा प्रकारे वक्तव्य केलं तर त्यांच्यावर कारवाई होईल. वीर सावकरांवर आक्षेपार्ह लिखाण केलं जात आहे. काँग्रेसचं मुखपत्र शिदोरी या नावाने येतं. त्यात वीर सावरकर माफीवीर होते, वीर सावरकर समलैंगिक होते, वीर सावरकर स्वातंत्र्य लढ्यात नव्हते. असं लिहिलं जात आहे. ज्याप्रमाणे संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच वीर सावरकरांवर आक्षेपार्ह लिहिणाऱ्या शिदोरीवर ही गुन्हा दाखल करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.