Satara News : शशिकांत शिंदेंच्या कारचे स्टेअरिंग नरेंद्र पाटलांच्या हाती; सातारा जिल्ह्यात महायुती बॅकफुटवर
-मुंबई APMC त एका संघटनेत राहून आमदार शशिकांत शिंदे व नरेंद्र पाटील यांच्यात छूपे युद्ध सुरू असल्याचं अनेकदा दिसलं आहे.मात्र आता “हम साथ साथ है”.
नवी मुंबई : अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे हे दोघे एकत्र दिसल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोडून भाजपात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपदही मिळवले.   मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत एका संघटनेत राहून आमदार शशिकांत शिंदे व नरेंद्र पाटील यांच्यात छूपे युद्ध सुरू असल्याचं अनेकदा दिसलं आहे.
नरेंद्र पाटील हे मराठा आरक्षणाची मागणी सर्वात पहिल्यांदा करणारे नेते अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव आहेत. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.
नरेंद्र पाटील यांचा साताराजिल्ह्यात चांगलाच दबदबा आहे. ते सोमवारी पाटणमध्ये शिवसेना उमेदवार शंभुराजे देसाई यांचा अर्ज भरतानाही उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांच्या विरोधात नरेंद्र पाटलांनी रान उठवले होते. मात्र तेच नरेंद्र पाटील चक्क शशिकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्या कारचे स्टेरिंग हाती घेताना दिसले, त्यामुळे खळबळ उडाली. शशिकांत शिंदे अर्ज भरत असतानाही पाटील उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच नरेंद्र पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्यात समेट झाल्याचं त्यामुळे स्पष्ट झालंय. सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर याचा परिणाम होण्याची शक्यता असून जिल्ह्यात महायुती बॅकफुटवर जाण्याची शक्यता आहे.