शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला, मोदी- शाहांचा निर्णय मान्य करणार
-आपण अडीच वर्षाच्या कार्यकाळा जे काम केलं त्यासाठी समाधानी आहोत. आपल्याला अन्य कोणत्याही पदा पेक्षा सख्ख्या बहीणींचा सख्खा भाऊ हे पद सर्वात मोठे आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
ठाणे -एकनाथ शिंदे यांनी आपली भूमीका स्पष्ट करत मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला आहे. मुख्यमंत्री कोणाला करायचं आहे त्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी घ्यावा. ते जो निर्णय घेतली तो आपल्याला मान्य असेल असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. आपण अडीच वर्षाच्या कार्यकाळा जे काम केलं त्यासाठी समाधानी आहोत. आपल्याला अन्य कोणत्याही पदा पेक्षा सख्ख्या बहीणींचा सख्खा भाऊ हे पद सर्वात मोठे आहे असं त्यांनी सांगितलं. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी आपण कॉल केला होता. त्यात त्यांना माझ्याकडून आणि शिवसेनेकडून कोणत्याही प्रकारची सरकार स्थापनेत आडकाठी येणार नाही असे स्पष्ट केले आहे. जो निर्णय भाजपचे श्रेष्ठी घेतली तो आम्हाला मान्य असेल असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची अडीच वर्षे संधी मिळाली. त्यात आपण समाधानी आहे. या काळात सर्व सामान्यांसाठी काम केलं. त्यामुळे आता सरकार स्थापनेसाठी ताणून धरणार नाही. तुम्ही जो निर्णय घ्याल तो एनडीएम्हणून आम्हाला मान्य असेल असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही पदा पेक्षा लाडक्या बहिणींचा सख्खा भाऊ हे पद माझ्यासाठी खुप मोठे आहे असं शिंदे यावेळी म्हणाले. गेल्या अडिच वर्षाच्या काळात प्रचंड काम केलं. विकास आणि योजना यांची योग्य सांगड आम्ही घातली. त्यामुळे महायुतीला येवढा मोठा विजय मिळाला. येवढा मोठा विजय आतापर्यंत कोणालाही मिळाला नाही. त्यामुळे तो ऐतिहासिक आहे असंही ते म्हणाले. या अडीच वर्षाच्या काळात स्वत:ला कधीही मुख्यमंत्री समजलो नाही. तर सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणूनच काम केले. जे लोक भेटायला आले त्या प्रत्येकाला भेटत राहीलो. त्यामुळेच सर्व सामान्यांचा मुख्यमंत्री अशी आपली ओळख झाली. ती आपल्यासाठी मोठी गोष्ट असल्याचेही शिंदे यावेळी म्हणाले.
गेल्या अडिच वर्ष महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम केले. त्यासाठी मोदी शाह यांचे पाठबळ मिळाले. ज्यावेळी आम्ही बंड केले त्यावेळी मोदी शाह आमच्या मागे खंबिर पणे उभे राहीले. त्यांची साथ आम्हाला मिळाली. हे विसरू शकलेलो नाही. जी संधी मिळाली त्यातून सर्व सामान्यांसाठी काम केलं. मी पण सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. त्यामुळे त्यांची दुख मला माहित आहेत. त्यामुळे संधी मिळाल्यानंतर सर्व सामान्यांसाठीच काम केले असं शिंदे यांनी आवर्जून सांगितलं. त्याचे समाधान आपल्याला आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत महाराष्ट्रातल्या जनतेसाठी काम करत राहाणार असल्याचेही ते म्हणाले. मला काय मिळालं या पेक्षा महाराष्ट्राला काय मिळाले याचा विचार नेहमीच केला. जनतेला काय मिळाले याचाच आम्हाला जास्त आनंद आहे असंही ते म्हणाले विधानसभा निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली. मुख्यमंत्री म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून राबलो. केवळ तीन ते चार तास झोप घेतली. शंभर पेक्षा जास्त सभा घेतल्या. प्रवास किती केला त्याचा नेम नाही. त्यामुळेच हे यश मिळू शकले असंही शिंदे यावेळी म्हणाले. अडिच वर्षाच्या काळात जे निर्णय घेतले ते प्रचंड होते. येवढे निर्णय आतापर्यंतच्या कोणत्याही सरकारने घेतलेले नाहीत असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे जनतेचा महायुतीला भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आमच्यात कोणतीही नाराजी नाही. नाराज होवून आम्ही रडणारे नाही तर लढणारे आहोत. लढून काम करणारे लोकं आम्ही आहोत. असं म्हणत या पुढच्या काळातही काम करत राहाणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.