शिवसेनेला हव्यात मुंबईतील या 17 जागा! भाजपा-राष्ट्रवादी काय करणार?
मुंबई : राज्यातील सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. ऑक्टोबर महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा या निवडणुकीत 'सामना' होणार आहे. या दोन्ही आघाडीत पक्षांची विरोधी पक्षासोबतच मित्रपक्षांशीही स्पर्धा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जागा लढवण्याची तयारी या पक्षांनी सुरु केलीय. जागा वाटपाची अंतिम चर्चा सुरु होण्यापूर्वीच पक्षांकडून जागांची मागणी केली जातीय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्षानं मुंबईतील 36 पैकी 25 जागा लढण्याची तयारी सुरु केलीय. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेनं 17 जागांची मागणी केली आहे.
कोणत्या जागांची मागणी?
'वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत मुंबईतील 17 जागांची मागणी शिवसेनेनं केलीय. आता जागांच्या मागणीवर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मित्रपक्ष काय प्रतिक्रिया देणार हे पाहावं लागेल.
भायखळा, वरळी शिवडी, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, चेंबूर, अणुशक्ती नगर, माहीम, धारावी, भांडुप पश्चिम, विक्रोळी, कुर्ला, अंधेरी पूर्व, मालाड पश्चिम, मागठाणे, चांदिवली आणि कलिना या जागांची आग्रही मागणी शिवसेनेनं केली आहे.
ठाकरे गटाचा कोणत्या जागांवर दावा?
मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत. त्या पैकी 25 जागांवर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे. मुंबईतील जास्तीत जास्त जागा लढवण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. शिवडी, भायखळा ,वरळी, माहीम, चेंबूर, भांडुप पश्चिम, विक्रोळी, मागाठाणे,जोगेश्वरी पूर्व,दिंडोशी, अंधेरी पूर्व ,कुर्ला, कलिना,दहिसर,गोरेगाव, वर्सोवा, वांद्रे पूर्व,विलेपार्ले, कुलाबा, वडाळा, चांदीवली, बोरिवली, मलबार हील, अणूशक्ती नगर, मानखुर्द आणि शिवाजीनगर या मुंबईतील 25 जागांवर ठाकरे गटानं दावा केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी काय दिला आदेश?
वर्षा'वर झालेल्या बैठकीमध्ये शिवसेना 110 जागांवर लढणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. शिवसेनेने 110 जागांची चाचपणी सुरू केली असून त्यासाठी प्रभारी आणि निरीक्षकही नेमले आहेत.   महायुतीमध्ये तणाव होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी काही जागांची अदलाबदल करावी लागली तर त्यासाठी तयारी ठेवा असे आदेशही शिवसेना नेत्यांना दिले आहेत.