राज्य मंत्रीमंडळ विस्तार लवकरात - मंत्रिमंडळातून चंद्रकांत पाटील, अतुल सावे यांना मिळणार डच्चू?
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाची शपथ घेऊन आता वर्षापेक्षाही जास्त कालावधी झाला आहे. परंतु त्यांच्या मंत्रिमंडळाची संख्या अजूनही पूर्ण झाली नाही. शिवसेना अन् भाजपमधील अनेक जण मंत्रिपदाची आस लावून बसले होते. मात्र त्यांना अजूनही संधी मिळाली नाही. त्यापूर्वी अजित पवार यांच्या गटासोबत आलेल्या नऊ जणांचा शपथविधी झाला आहे. आता दोन पक्षांचे सरकार तीन पक्षांचे झाले आहे. या तिन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये कोणाला संधी मिळणार? ही चर्चा सुरु असताना चंद्रकांत पाटील अन् अतुल सावे यांना वगळण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यासंदर्भात सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
भाजपमध्ये होणार बदल
भारतीय जनता पक्षात २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे बदल केले जाणार आहे. काही जणांना संघटनेची जबाबदारी दिली जाणार आहे. तसेच काही जणांना मंत्री करुन त्यांचे मतदार संघ बळकट करण्याची योजना आहे. सध्या भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग अन् संसदीय कामकाज कामकाज ही खाती आहे. तर अतुल सावे यांच्याकडे सहकार खाते आहे.
या दोघांना संघटनेची जबाबदारी दिली जाणार आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. ते अजित पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. अतुल सावे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनजंय मुंडे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.
अजित पवार गटाला भाजपच्या खात्यातील मंत्रीपद
अजित पवार यांच्या गटाला भाजपच्या कोट्यातील मंत्रीपद दिली जाणार आहे. त्यांना शिंदे गटातील कोट्यातून मंत्रीपद दिले जाणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. यामुळे भाजपकडे असणारी खाती राष्ट्रवादीकडे जाणार आहेत. त्यात अर्थखातेही अजित पवार यांना मिळणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या १३ खाती आहेत. त्यांचा कार्यभार कमी केला जाणार आहे. एकनाथ शिंदे स्वत:कडे नगरविकास, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क ही खाती कायम ठेवणार आहेत. फडणवीस यांच्याकडील अर्थ खाते अजित पवार यांना दिले जाईल. सध्या अजित पवार यांच्याकडे सात खाती आहे.