मुंबईकरांसाठी ठाकरे बंधुंचा ‘गेमचेंजर’ वचननामा; १० रुपयांत नाश्ता-जेवण, गल्लीबोळात बाईक ॲम्ब्युलन्स, मोफत वीज – मुंबई महापालिका निवडणुकीआधी मोठ्या घोषणा
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क:
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी आज मुंबईकरांसाठी महत्त्वाकांक्षी आणि जनसामान्यांना दिलासा देणारा संयुक्त वचननामा जाहीर केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
या वचननाम्यात मुंबईकरांच्या घर, रोजगार, आरोग्य, शिक्षण, वाहतूक आणि जीवनावश्यक खर्चावर लक्ष केंद्रित करत तब्बल १० ‘गेमचेंजर’ घोषणा करण्यात आल्या आहेत.
ठाकरे बंधुंचा वचननामा: मुंबईकरांसाठी १० ठळक मुद्दे
1) मुंबईची जमीन – मुंबईकरांसाठीच
महापालिकेच्या मालकीच्या जमिनी खासगी विकासकांना न देता शासकीय, महापालिका, बेस्ट, पोलीस कर्मचारी तसेच गिरणी कामगारांना हक्काची घरे देण्यात येणार.
2) १० रुपयांत नाश्ता आणि जेवण
कष्टकरी मुंबईकरांसाठी ‘माँसाहेब किचन्स’ सुरू करून फक्त १० रुपयांत नाश्ता व दुपारचे जेवण उपलब्ध करून देण्यात येणार.
3) गृहनिर्माण प्राधिकरण
पुढील ५ वर्षांत १ लाख मुंबईकरांना परवडणारी हक्काची घरे देण्याचे आश्वासन.
4) घरकाम करणाऱ्या महिलांसाठी स्वाभिमान निधी
घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करून नोंदणीकृत महिलांना दरमहा ₹१,५०० स्वाभिमान निधी दिला जाणार.
5) वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्वयंरोजगार अर्थसाह्य योजना
• १ लाख तरुण-तरुणींना ₹२५ हजार ते ₹१ लाख स्वयंरोजगारासाठी सहाय्य
• २५ हजार गिग वर्कर्स व डबेवाल्यांना ई-बाईकसाठी बिनव्याजी कर्ज
6) १०० युनिटपर्यंत मोफत वीज
बेस्ट विद्युतच्या घरगुती ग्राहकांना १०० युनिटपर्यंत वीज मोफत. पूर्व-पश्चिम उपनगरांत वीजसेवा विस्तारासाठी विशेष योजना.
7) स्वस्त आणि मजबूत बेस्ट सेवा
• तिकीट दर ₹५–१०–१५–२० फ्लॅट रेट
• १०,००० इलेक्ट्रिक बस आणि २०० डबल डेकर ई-बस
• जुने मार्ग पुन्हा सुरू
• महिला व विद्यार्थ्यांसाठी मोफत बस प्रवास
8) रोजगार आणि स्पर्धा परीक्षांसाठी संधी
• महापालिकेतील अत्यावश्यक रिक्त पदे भरणार
• इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी ऑन-साइट अप्रेंटिसशिप
• मराठी तरुणांसाठी वसतिगृहे
• प्रत्येक वॉर्डात UPSC–MPSC सी.डी. देशमुख प्रशिक्षण केंद्र
9) मैदानं, उद्यानं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा
प्रत्येक वॉर्डात खुली मैदानं, नागरिकांसाठी कट्टे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आणि ‘आजोबा-आजी उद्यान’ उभारले जाणार.
10) आरोग्य सेवांचा मोठा विस्तार
• मुंबईत ५ नवीन वैद्यकीय महाविद्यालये
(गोवंडी, कांदिवली, मुलुंड, बोरिवली, घाटकोपर)
• रॅपिड बाईक मेडिकल असिस्टन्स (ॲम्ब्युलन्स) सेवा –
वाहतूक कोंडीतही गल्लीबोळात पोहोचणारी बाईक ॲम्ब्युलन्स, प्रशिक्षित पॅरामेडिकल स्टाफ, डिफिब्रिलेटर, ऑक्सिजनसह ‘गोल्डन अवर’मध्ये तातडीचा उपचार.
11) युवा मुंबईकरांसाठी खास योजना
• प्रत्येक वॉर्डात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
• जुन्या व्यायामशाळांची दुरुस्ती
• म्युझिक कॉन्सर्ट व IPL सामन्यांसाठी ‘मुंबईकर स्टँड’मध्ये १% आसने १८–२१ वयोगटातील युवकांसाठी लॉटरीद्वारे मोफत
मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाला दिलासा देणारा वचननामा
घर, रोजगार, आरोग्य आणि स्वस्त जीवनावश्यक सुविधांवर भर देणाऱ्या या वचननाम्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय तापमान चांगलेच वाढण्याची शक्यता आहे. आता मुंबईकर या घोषणांना कितपत प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.