ठाकरेंना पुन्हा धक्का बसणार? चार आमदार साथ सोडणार, मंत्र्याचा दावा - शिंदेंकडे जाणारे ते आमदार कोण? चर्चा सुरु
अमरावती : शिवसेनेचे (ठाकरे गट) दोन आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आणखी चार आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. या दाव्याने ते चार आमदार नेमके कोण याविषयीची चर्चा वाढली आहे.
अमरावती दौऱ्यावर आलेल्या सामंत यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ठाकरे गटाचे सहा आमदार आमच्या संपर्कात असल्याचे आम्ही आधीच सांगितले होते. यातून दोघे शिंदे गटात आले आहेत. अद्याप चार आमदार आमच्या संपर्कात आहेत. अजित पवार यांच्यामुळे शिवसेनेत कुठलीही अस्वस्थता नाही. त्यांच्या येण्याने ताकद वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यात नेमके कुणाला स्थान मिळणार हे मुख्यमंत्रीच ठरविणार आहेत. काँग्रेसचा गट सोबत येणार असल्यास त्यांनाही सत्तेत सहभागी केले जाईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढविल्या जाणार आहेत. पुढेही तेच मुख्यमंत्री राहणार असल्याचा दावा सामंत यांनी केला.
आमदार बच्चू कडू यांची नाराजी दूर होणार आहे. बच्चू कडू यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात शिंदे गटातील अनेकांना अद्यापही स्थान मिळाले नाही. आमचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारात बच्चू कडू यांना न्याय मिळेल असेही ते म्हणाले.
मनीषा कायंदे, नीलम गोऱ्हे शिंदे गटात आता कोण?
विधानपरिषदेत ठाकरेंसोबत असलेल्या आमदारांपैकी मनीषा कायंदे यांनी शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही दिवसांमध्येच विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे देखील एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य करत सेनेत गेल्या. विधिमंडळ अधिवेशनापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हे मोठे धक्के बसले होते. आता उदय सामंतांनी आणखी चार आमदार येणार असल्याचं म्हटल्यानं ते आमदार कोण असतील याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.