सर्वात मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधान परिषदेत 3 मोठ्या घोषणा
मुंबई | 24 जुलै 2023 : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आला. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. पुरात अनेकजण वाहून गेली. तसेच अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे गावकऱ्यांचं घरादाराचं नुकसान झालं. या सगळ्या घटनांची गंभीर दखल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. त्यांनी आज विधान परिषदे या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधान परिषदेत आज राज्यातील पूरपरिस्थितीवर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी तीन मोठ्या घोषणा केल्या. पूरग्रस्तांना तातडीची 10 हजार रुपयांची मदत करणार. दुकानांचं नुकसान झाल्यास 50 हजारांची मदत केली जाणार आणि पुरात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत दिली जाईल.
“१९ जुलैला राज्याच्या विविध जिल्ह्यांत अतिवृष्टीजनक पाऊस पडला. यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडला. यवतमाळमध्ये ११० नागरिकांना एनडीआरएफने बाहेर काढले. मदतीसाठी हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली”, असं अजित पवार म्हणाले.
“बुलढाणा जिल्ह्यात १०२ मिलीमीटर पाऊस पडला. तेथे नदी-नाल्यांना पूर आला होता. वाशिममध्ये १३९.७ मिलीमीटर पाऊस पडला. वेगवेगळ्या जिल्ह्यात मदतकार्य पथक ही तैनात करण्यात आली”, अशी माहिती अजित पवार यांनी विधान परिषदेत दिली.
“या अवकाळी पावसात मृत पावलेल्यांना तातडीने ४ लाखाची मदत जाहीर केलीय. तातडीने पिक पंचनामेचे काढण्याचे निर्देश दिले आहेत. पुरात घराचं नुकसान झालेल्यांना 5 ऐवजी 10 हजारांचं सानुग्रह अनुदान मदत देण्याचे निर्देश देण्यात आले आहे”, असं अजित पवार यांनी विधान परिषदेत सांगितलं.