लेडीजबारवर कारवाई करणाऱ्या ‘डॅशिंग डेमोलिशन मॅन’ राहुल गेंठेची उचलबांगडी, काय आहे प्रकरण?
 
नवी मुंबई मनपा अतिक्रमण उप आयुक्त राहुल गेंठेची   उचलबंगडी
नवी मुंबईत लेडीजबारवर कारवाई करणाऱ्या डॅा. गेठेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तडकाफडकी बदली.....
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी असणारे डॅा. राहुल गेठे यांची २८ सप्टेंबरला मुख्यमंत्री कार्यालयातून नवी मुंबई महानगर पालिकेत बदली करण्यात आली आहे. अतिक्रमण विरोधी कारवाई विभागाचे उपायुक्त म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी अतिक्रमणविरोधी कारवाईला आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखालील सुरूवात केली. अनधिकृत फेरीवाले, हॅाटेल व्यावसायिक, तसेच लेडीज बारवर त्यांनी कारवाईचा बडगा उगारला. नवी मुंबईत १२०० लहान मोठी हॅाटेल्स आणि बार रेस्टॅारंट आहेत.
यात जवळपास ६०च्या आसपास लेडीज बार आहेत. राज्यात लेडीज बारवर सरकारने बंदी घातलेली आहे. मात्र ठाणे जिल्ह्याप्रमाणेच नवी मुंबई आणि रायगडच्या प्रवेशद्वाराजवळ लेडीज बारचा सुळसुळाट झाला आहे. यातील नवी मुंबईतील लेडीज बारमालक सरकारला न जुमानता कायदा धाब्यावर बसवून महिन्याला कोट्यावधी रूपयांची उलाढाल करताना सरकारचा लाखोंचा महसूल बुडवत असतात.या बारवाल्यांनी आपल्या हॅाटेलांमध्ये अनेक अभियांत्रिकी गैरबदल करत नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू केला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कारवाईचा हातोडा पडताच या लॅाबीने वेगवेगळ्या पद्धतीने आयुक्त राजेश नार्वेकर आणि डॅा.राहुल गेठे यांच्यावर दबाव आणायचा प्रयत्न केला. गृहमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असल्याने या लेडीजबार मालकांची डाळ शिजत नव्हती.
मुख्यमंत्री अचानक जागे झाले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी एका अध्यात्मिक कार्यक्रमासाठी कोल्हापूरला गेले होते. तो कार्यक्रम आटोपून ते पहाटे मुंबईला परतले. तेव्हापासून त्यांची तब्येतही बरी नव्हती.अंगात ताप होता. त्यामुळे ते औषध घेऊन विश्रांती घेत होते. अश्या स्थितीतही नवी मुंबईतील लेडीजबार मालकांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांना खडबडून जागे करण्यात आले. तापाने गरम होणारे मुख्यमंत्री अवघ्या ४० सेकंदात ॲक्शन मोडमध्ये पोहचले . त्यांनी तडक नवी मुंबई मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांना फोन केला. एरव्ही ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांशी खूपच सौजन्याने वागणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आयुक्तांवरही या लेडीजबारवाल्यांसाठी प्रचंड संतापले. त्यांनी एक तासाच्या आत उपायुक्त डॅा. राहुल गेठे यांच्याकडील अनधिकृत कारवाईची जबाबदारी काढून घेण्याचे आदेश दिले.
याच डॅा.गेठे यांनी पालिका वर्षभरात जितका दंडात्मक महसूल या कारवायांमुळे जमवते तितका महसूल अवघ्या २१ दिवसांत जमवलाय. या कारवायांमुळे पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १३ लाख रूपये जमा झाले आहेत. नवी मुंबईतील अनेक नागरिकांकडून लेडिजबार बद्दल तक्रारी येत होत्या. मात्र धडाकेबाज अधिकाऱ्याच्या शोधात असलेल्या पालिकेला डॅा. राहुल गेठे यांच्या रूपाने ‘डॅशिंग डेमोलिशन मॅन’ मिळाला होता.
आयुक्त नार्वेकर यांच्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेडिजबारवाल्यांवरील कारवाई बद्दल डॅा. गेठे यांना जोरदार झापल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. याबाबत प्रतिक्रियेसाठी डॅा. गेठे यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
---------------------------------------