अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी कधी मिळणार? - प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टच सांगितलं
नागपूर | 27 जुलै 2023 : अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरला आहे. राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदारांनीही अजित पवार हे भविष्यातील मुख्यमंत्री असल्याची विधान केली आहेत. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांनी अधिकच जोर धरला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चांवर अजित पवार यांनी काहीच भाष्य केलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचं गूढ अधिकच वाढलं आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य करून एकच खळबळ उडवून दिली आहे.
प्रफुल्ल पटेल मीडियाशी संवाद साधत होते. आज ती जागा रिकामी नाही. मग चर्चा कशाला करता? अजितदादा महाराष्ट्रातील वजनदार लोकप्रिय नेते आहेत. आमच्या पक्षाचं नेतृत्व करत आले आहेत. काम करणाऱ्यांना कधी ना कधी, आज ना उद्या, उद्या ना परवा संधी मिळतच असते. अनेक लोकांना मिळाली. अजित पवारांना आज ना उद्या संधी मिळेलच. आम्हीही त्या दिशेने काम करत आहोत, असं सूचक विधान प्रफुल्ल पटेला यांनी केलं आहे. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला.
ताकदीने प्रयत्न करू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थर्ड टर्म मिळावी म्हणून तुम्ही प्रयत्न करत आहात का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. आमचा पक्ष काही दिवसांपूर्वी एनडीएमध्ये सहभागी झाला आहे. त्यामुळे आम्ही सगळे जेवढे ताकदीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसरी टर्म मिळवण्यासाठी लढणार आहोत, असं पटेल यांनी सांगितलं.
एवढं सोप्पं नाही
भारत दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आलेला आहे. आपला जीडीपी आहे, येणाऱ्या पाच वर्षात नक्कीच विश्वास तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो आणि त्यासाठी एक स्थिर चांगलं, विकासशील सरकारची गरज आहे. आज देशात ज्याप्रमाणे राजकारण चाललेलं आहे, म्हणजे कालपर्यंत आम्ही होतो म्हणून काही टीका करायचं कारण नाही. पण जे काही आपल्याला दिसत आहे, वेगवेगळे पक्ष, वेगवेगळे विचारधारा आणि एवढ्या साऱ्या लोकांना एकत्र आणणं ही काही सोपी गोष्ट नाही, असंही त्यांनी सांगितलं.
ती काळाची गरज
एक चांगलं स्थिर सरकार आणि या सरकारच्या चेहरा असला पाहिजे. त्या चेहऱ्यावर लोकांचा विश्वास असला पाहिजे. ही आज काळाची गरज आहे. म्हणून आम्ही पण निर्णय घेतला, अनेक बाबतींचा विचार करून निर्णय केला. मागच्या काही दिवसांमध्ये आज जे इंडिया म्हणतात त्यांच्या मीटिंगमध्ये मला जाण्याचा एकदा प्रसंग आला. त्यावेळी अनेक पक्षाचे आणि वेगवेगळ्या विचाराचे लोक एकत्र आले होते. पण त्यांच्यात विश्वासहार्यता प्रस्थापित करू शकत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
अविश्वास ठराव पारित होऊ शकत नाही
लोकसभेत सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. हे जे सगळं काही चाललंय ते काही नाही. 30 वर्ष संसदेत अविश्वास प्रस्ताव आलेले आहेत. नो कॉन्फिडन्स मोशन कितपत यशस्वी होतात हे सगळ्यांना माहिती आहे. यावेळी लोकसभेचे आकडे आहेत.
त्या आकड्याच्या आधारावर कुठल्याही परिस्थितीत अविश्वास मग ठराव पारित होऊ शकत नाही. कारण भाजपचे स्वतःचे 300 च्यावर सदस्य आहेत. अविश्वास प्रस्ताव आणणे म्हणजे लोकांच्या डोळ्यात धुळ फेकणे आहे. त्याला काही अर्थ नाही. सगळ्यांना माहिती आहे. यांनाही माहिती आहे की त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.