कोणता झेंडा घेऊ हाती?, नवाब मलिक शरद पवार गटात जाणार की अजितदादा गटात?; सस्पेन्स कायम
मुंबई : तब्बल 17 महिन्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जामीन मिळाला आहे. आरोग्याच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने मलिक यांना दोन महिन्यासाठी जामीन दिला आहे. त्यामुळे मलिक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या एक ते दोन दिवसात मलिक तुरुंगाबाहेर येतील. मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने जोरदार जल्लोष केला. दोन्ही गटांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. मात्र, मलिक नेमके कोणत्या गटाचे आहेत हे अद्याप स्पष्ट झाले नाही. नवाब मलिक हे तुरुंगातून बाहेर आल्यावर शरद पवार गटाचा झेंडा हाती घेणार की अजितदादा गटाचा यावर अजूनही सस्पेन्स आहे. मलिक हे तुरुंगातून बाहेर आल्यावरच त्यांची नेमकी भूमिका समजून येणार आहे.
भाजपच्या आरोपानंतर नवाब मलिक यांची चौकशी सुरू झाली होती. चौकशीनंतर त्यांना अटकही करण्यात आली. मलिक तुरुंगात असतानाच शिवसेनेत फूट पडली. महाविकास आघाडीची राज्यातील सत्ता गेली. त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली आणि अजितदादा गट भाजपच्या सत्तेत सहभागी झाला. शरद पवार यांचा गट कमकुवत झाला. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजितदादा गटाने मलिक यांना आपल्यासोबत येण्याची ऑफरही दिली होती. पण मलिक यांनी ती ऑफर नाकारली होती. आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मलिक काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
त्यांना निर्णय घेऊ द्या
दरम्यान, अजितदादा गटाकडून नवाब मलिक यांच्या सुटकेचं स्वागत केलं आहे. मात्र, अजितदादा गटाने सावध प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा गटाचे नेते, खासदार सुनील तटकरे यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली आहे. मलिक यांना जामीन मिळाला याचे समाधान आहे. मलिक हे ज्येष्ठ नेते आहेत. अनेक वर्षांपासून नेतृत्व करत आहेत. ते बाहेर आल्यावर योग्य निर्णय घेतील. मी त्यावर बोलणार नाही. आएधी त्यांना बाहेर येऊ द्या. त्यांना निर्णय घेऊ द्या. त्यानंतर आम्ही प्रतिक्रिया देऊच की, असं सुनील तटकरे म्हणाले.
मलिक निर्णय घेतील
नवाब मलीक यांना जामीन मिळाला आहे त्याचा आनंद आहे. त्यांचे भाऊ, मुलगी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता जरी दोन गट झाले असले तरी ते दोन्ही नेत्यांना भेटतील. त्यानंतर त्यांचा निर्णय घेतील. आम्ही आता भाजपसोबत एकत्र आहोत ही वस्तुस्थिती आहे. पण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. आता वेगळी आहे. त्यानंतरही आमचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे निर्णय घेतील, असं अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितलं.
आम्हाला आनंद आहे
शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनीही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका खोट्या प्रकरणात नवाब मलिक यांनी अडकविले होते. त्यांना बेल मिळाली याचा आनंद आहे. दीड वर्ष तुरुंगात घातले. हे प्रकरण काय हे जनतेला माहिती आहे. महाराष्ट्र आणि देशात राजकारणासाठी खालच्या पातळीवर उतरून तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. सुप्रीम कोर्टात काय झाले याची माहिती घेऊ. या बेलचा आम्हाला अतिशय आनंद आहे, असं अनिल देशमुख म्हणाले.