नवी मुंबई महानगरपालिकेने पहिल्यांदाच ओलांडले 800 कोटी करवसूली रक्कमेचे उद्दिष्ट

सर्व विभागांनी साध्य केली 100 टक्के उद्दिष्टपूर्ती
करभरणा करुन महानगरपालिकेस सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी मानले आभार
सन 2024-25 वर्षात मालमत्ता करापोटी 826.12 कोटी, पाणी पुरवठयापोटी 105.93 कोटी व बांधकाम परवानगीपोटी 381.90 कोटी जमा
या वर्षापासून करभरण्यासाठी सर्व पेमेंट सुविधा उपलब्धता आणि वार्षिक देयक वितरणास होणार सुरूवात
या वर्षीपासून पाणीदेयकेही ऑनलाईन उपलब्ध होणार
नवी मुंबई महानगरपालिकेकडे मालमत्ताकर, पाणीपट्टी, बांधकाम परवानगी प्रस्ताव, परवाना शुल्क अशा विविध बाबींमधून जमा होणाऱ्या महसूलातूनच नागरी सेवासुविधांची परिपूर्ती केली जात असते. याकरिता सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे करवसूलीची बहुतांशी प्रमाणात उद्दीष्टपूर्ती झाली असून त्याबद्दल महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी नवी मुंबईकर नागरिकांचे आभार व्यक्त केले आहेत.* यामध्ये मालमत्ता कर विभागाने 826.12 कोटी इतका मालमत्ता कर जमा केला असून त्यामध्ये अभय योजनेव्दारे थकीत मालमत्ताकरावरील शास्ती रकमेवर 50 टक्क्यांच्या सूटीचा लाभ घेत 20.97 कोटी इतकी रक्कम जमा झालेली आहेव तितक्याच रक्कमेची सवलत थकबाकीदारांना झाले आहे.* त्याचप्रमाणे पाणीपुरवठा विभागामार्फत 105.93 कोटी इतकी रक्कम जल देयकांमार्फत जमा झालेली आहे. पाणी पुरवठा विभागामार्फत देण्यात आलेल्या अभय योजनेचा लाभही नागरिकांनी मोठया प्रमाणावर घेतला.* नगररचना विभागामार्फत बांधकाम परवानगी पोटी 381.90 कोटी इतके शुल्क जमा झाले असून यामध्ये पुनर्विकास प्रकल्प प्रस्तावांच्या मंजूरीचा मोठा भाग आहे.* परवाना विभागानेही विविध परवानग्या विहित वेळेत दिल्याने 14.60 कोटी इतकी प्रत्यक्ष शुल्क जमा झालेली आहे.* स्थानिक संस्था करापोटीही 28.04 कोटी जमा झालेली आहे. तसेच इतरही विभागांमध्ये महसूल जमा होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.* सर्व विभागांनी 100 टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य केली असून हे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागप्रमुख व त्या त्या विभागांचे अधिकारी –कर्मचारी यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न महत्वाचे आहेत. या सर्वच अधिकारी – कर्मचारीवृंदाच्या उल्लेखनीय कामाची आयुक्तांनी प्रशंसा केली आहे. ही उद्दीष्टपूर्ती होण्यामागे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या प्रत्येक विभागाच्या आहे. त्यामुळे नागरिकांना सहजपणे आपली देयके भरता यावीत याकरिता आयुक्त महोदयांच्या संकल्पनेतून ऑनलाईन प्रणालीवर विशेष भर देण्यात आला. ऑनलाईन देयके भरताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी नविन ऑनलाईन मालमत्ता संकलन प्रणाली सुरु करण्यात आली. महानगरपालिकेच्या संकेतस्थळाप्रमाणेच स्वतंत्र ॲप कार्यान्वित करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. नेटबॅकींग, डेबिट/क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, क्यू आर कोड तसेच महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात रोख / धनादेश / डीडी अशी विविध माध्यमे देयके भरणा करण्यासाठी उपलब्ध असल्याने तसेच ऑनलाईन प्रणालीव्दारे घरबसल्या देयके अदायगीची सुविधा लाभल्याने नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद लाभला. यासोबतच मालमत्ता कर व पाणीपट्टी थकबाकीदारांना नोटीसा देणे, त्यांचे नळ कनेक्शन बंद करणे अशी कारवाई देखील करण्यात आली. नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेत मालमत्ताकर भरावा यासाठी थकीत मालमत्ताकरावरील शास्ती रकमेवर 50 टक्क्यांची सूट देणारी 'अभय' योजना जाहीर करण्यात आली. अशीच अभय योजना पाणी देयकांसाठीही राबविण्यात आली. नागरिकांसाठी सुट्ट्यांच्या दिवशी देयक भरणा केंद्रे सुरू ठेवण्यात आली. या सर्वांचा लाभ नागरिकांनी मोठया प्रमाणावर घेतला. नवी मुंबई हे झपाटयाने विकसीत होणारे शहर असून शहरातील प्रकल्प व सुविधा कामांचा दर्जा अधिक उत्तम राखण्यासाठी महानगरपालिकेकडे जमा होणारा महसूल अत्यंत महत्वाचा असून सामाजिक जबाबदारीच्या भावनेने विहित वेळेत करभरणा करणाऱ्या व इतरही बाबींमध्ये महानगरपालिकेच्या महसूल वाढीला सहकार्य करणाऱ्या जागरुक नवी मुंबईकर नागरिकांचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी आभार व्यक्त केले आहेत. 2024-25 या वर्षात सुरू असलेल्या ऑनलाईन पेमेंट सुविधांमध्ये लवकरच भारत बिल पेमंट सिस्टीमची भर घालण्यात येत असून नागरिकांना अत्यंत सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यासोबतच मालमत्ताकराचे वर्षभराचे एक देयक अदा केले जाणार असून नागरिक वर्षभरात टप्प्याटप्प्याने देयक रक्कम भरू शकतात. त्याचप्रमाणे पाणी देयकेही ऑनलाईन उपलब्ध होणार असून सर्व पेंमेंट सुविधेव्दारे ती भरणा करता येतील. यापुढील काळातही अशाच प्रकारचे सहकार्य नागरिकांकडून लाभेल असा विश्वास आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.*