सावधान, IMD कडून राज्यात Heat Wave चा अलर्ट
पुणे : देशात अनेक ठिकाणी उन्हाचा तडाखा बसत आहे. राज्यांमध्येही उष्मा झपाट्याने वाढत आहे. पुणे हवामान विभागाने राज्यांमधील अनेक ठिकाणी येत्या काही दिवसांत तापमानात झपाट्याने वाढ होणार आहे. अगदी Heat Wave चा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. राज्यात पावसानंतर आता उन्हाचा तडाखा बसत आहे. अनेक शहरांचे तापमानाने चाळिशी पार केली आहे. काही ढगाळ वातावरण असतांना देखील प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक शहरात उन्हाचा तडाखा वाढला असून पारा 40 अंशावर चढला आहे.
पुण्यात पाऊस अन् तापमान वाढ
पुणे शहरासाठी पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. आज आणि उद्या शहरात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान खात्याकडून शहरासह पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच दुपारच्या सुमारास शहरातील तापमानात मोठी वाढ होणार आहे. पुण्यात आज तापमान 38 अंश सेल्सिअस गेले असून शहराचे तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.
विदर्भात तापमान वाढ
खारघर येथे महाराष्ट्र भूषण वितरण कार्यक्रमात उष्माघाताने १३ बळी गेले. त्याचवेळी राज्यातील अनेक जिल्ह्यातील तापमान ४० अंशांच्यावर गेले आहे. एप्रिल महिन्यांच्या सुरुवातीपासून विदर्भातील अनेक शहरांचे तापमान वाढत आहे. मागील सहा दिवसांपासून चंद्रपूरचे तापमान सतत वाढत आहे. सलग सहाव्या दिवशीसुद्धा चंद्रपूरच्या तापमानाने उच्चांक गाठला आहे. १२ एप्रिल रोजी ४२.२, १३ एप्रिल रोजी ४३.२, १४ एप्रिलला ४२.८ तर, १७ एप्रिलचे तापमानही उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.
भुसावळात सर्वाधिक तापमान
भुसावळात १३ एप्रिलनंतर सोमवारी पाचव्या दिवशी कमाल तापमान पुन्हा ४३.३ अंश नोंदवले गेले. शहरातील केंद्रीय जल आयोग कार्यालयात ही नोंद झाली. दरम्यान, पश्चिमी भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे एप्रिलच्या उर्वरित १३ दिवस तापमानाचा ४२ ते ४७ अंशांदरम्यान राहील. प्रामुख्याने २९ एप्रिल रोजी ते उच्चांकी ४७ अंशांपर्यंत पोहोचू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
नंदुरबार ४० पार
नंदुरबार जिल्ह्यात तापमानाच्या पारा ४० पार केल्याने मोठ्या प्रमाणावर उकाळा आहे. तापमानाच्या पारा अधिक वाढल्याने विजेचे युनिट देखील वाढणार आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या आर्थिक गणित बिघडणार असल्याचे दिसून येत आहे.