हळद,तूर सोयाबीनच्या दरात वाढ - मूग, मक्याच्या दरात घसरण
पुणे   : मक्यासाठी २ मेपासून NCDEX मध्ये सप्टेंबर डिलिव्हरी व्यवहार सुरू झाले. MCX मध्ये कापसासाठी नोव्हेंबर व जानेवारी (२०२४) डिलिव्हरी व्यवहार सुरू झाले.त्यामुळे सध्या NCDEX मध्ये मक्यासाठी मे, जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर डिलिव्हरीचे, हळदीसाठी मे, जून, ऑगस्ट व ऑक्टोबर डिलिव्हरीचे, तर MCX मध्ये कापसासाठी जून, ऑगस्ट, नोव्हेंबर व जानेवारी (२०२४) डिलिव्हरीचे आणि कपाशीसाठी नोव्हेंबर, फेब्रुवारी (२०२४) व एप्रिल (२०२४) डिलिव्हरीचे व्यवहार सुरू आहेत.
गेल्या सप्ताहाच्या तुलनेने या सप्ताहात मक्याचे भाव ३.९ टक्क्यांनी, तर मुगाचे भाव २.५ टक्क्यांनी उतरले. या वर्षी खाद्यतेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती घसरल्या.आपली आयातसुद्धा वाढली. त्यामुळे तेलाच्या किरकोळ किमतीसुद्धा उतरू लागल्या आहेत. त्याचा परिणाम सोयाबीनसारख्या पिकांच्या किमतींवर होत आहे.
५ मे रोजी संपणाऱ्या सप्ताहातील किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत ः
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात रु. ६१,७८० वर आले होते. या सप्ताहात ते ०.३ टक्क्याने वाढून रु. ६१,९८० वर आले आहेत. जून फ्यूचर्स भाव ०.६ टक्क्याने वाढून रु. ६३,३०० वर आले आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स रु. ६३,००० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा १.६ टक्क्याने अधिक आहेत.कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) गेल्या सप्ताहात रु. १,५४७ वर आले होते. या सप्ताहात ते ०.५ टक्क्याने वाढून रु. १,५५४ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,५६० वर टिकून आहेत. कापसाचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० आहेत.
मका
NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) या महिन्यात घसरत आहेत. या सप्ताहात त्या पुन्हा ३.९ टक्क्यांनी घसरून रु. १,८२० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (जून डिलिव्हरी) किमतीसुद्धा ४ टक्क्यांनी घसरून रु. १,८३७ वर आल्या आहेत.ऑगस्ट फ्यूचर्स किमती रु. १,८५८ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.१ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे. रब्बी मक्याची आवक वाढत आहे त्याचा परिणाम किमतींवर दिसून येत आहे.
हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात रु. ६,७५५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ४.२ टक्क्यांनी वाढून रु. ७,०४२ वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती रु. ७,५३४ वर आल्या आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स किमती रु. ७,६३८ वर आल्या आहेत स्पॉट भावापेक्षा त्या ८.५ टक्क्यांनी अधिक आहेत. ऑक्टोबर भावसुद्धा (रु. ७,७४२) चांगला आहे. फ्यूचर्स विक्रीला संधी आहे.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात ०.५ टक्क्याने घसरून रु. ४,७७५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.५ टक्क्याने वाढून रु. ४,८०० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे. सध्याचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. आवक वाढू लागली आहे. सध्या ती साप्ताहिक १ लाख टनापेक्षा अधिक आहे. आवकेचा परिणाम किमतींवर दिसत आहे.
मूग
मुगाच्या किमती एप्रिल महिन्यात घसरत आहेत. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) या सप्ताहात ५.८ टक्क्यांनी घसरून रु. ८,१०० वर आली आहे. आवक कमी आहे.
सोयाबीन
सोयाबीनच्या स्पॉट किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या. गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) २.४ टक्क्यांनी घसरून रु. ५,२२७ वर आली होती. या सप्ताहात ती १.९ टक्क्याने वाढून रु. ५,३२८ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे.
तूर
तुरीची स्पॉट किमत (अकोला) या सप्ताहात २ टक्क्यांनी वाढून रु. ८,२३३ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० आहे.