निसर्गाची शेतकऱ्यांवर अवकृपा, आधी अवकाळीचा आणि आता उन्हाचा तडाखा
पुणे : राज्यात मागच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळतं आहे. त्यामध्ये रब्बी हंगामातील काढणीला आलेली पिके पुर्णपणे खराब झाली आहेत. यंदा   निसर्गाने साथ न दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. अशीच स्थिती राहील तर शेतकऱ्यांनी जगायचे कसे, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.अवकाळीनंतर हरभरा पिकावर भिस्त होती. ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावरही मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पीक धोक्यात आल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामीण भागात, हरभरा काढणीच्या कामांना वेग आला आहे. उन्हाचा चटका वाढू लागल्याने रब्बी हंगामात पेरलेला हरभरा काढून तो भरडायला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. हरभरा काढून त्याची मळणी करून त्याची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग पहायला मिळत आहे. सततच्या वातावरणाच्या बदलामुळे यंदा हरभरा पिकाचे उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मागच्या आठ दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसान झालेली पीकं काढताना शेतकरी आपल्या वेदना सांगत आहेत.
या संकटातून सावरुन शेतकऱ्यांनी उधार, उसणवारी करीत रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकाचा पेरा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. मात्र चार ते पाच दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण, पहाटे पडणारे दाट धुके अशा हवामान बदलामुळे या पिकाला चांगलाच फटका बसत असल्याने रब्बी पिकही वाया जाणार का ? अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.