पुणे APMC मध्ये 200 कोटींचा भ्रष्टाचार? अजित पवारांनी उत्तर द्यावं – रोहित पवा
.png)
पुणे : शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी स्थापन झालेली पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) ही गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकली असून, अधिकारी व संचालकांच्या संगनमताने तब्बल २०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
या भ्रष्टाचारात पालकमंत्री अजित पवार यांच्या नावाचा वापर झाल्याचे सांगून, त्यांनी याबाबत खुलासा करण्याची मागणी केली आहे.
सोमवारी (ता.८) झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी गैरव्यवहारांची यादी वाचून दाखविली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे उपस्थित होते.
“सरकारकडे अनेक पुरावे दिले असूनही   चौकशी पारदर्शकपणे होत नाही,” असा रोहित पवार यांचा आरोप आहे.
• बेकायदा भाडे वसुली (जी ५६ व्यवहार)
• ४ हजार लोकांना अनधिकृत परवाने
• बाजार समितीच्या जागा बेकायदेशीरपणे भाड्याने देणे
• रोजंदारी सेवकांच्या कायम नियुक्तीत भ्रष्टाचार
• गाळ्यांचे अनधिकृत वाटप
• शेतकऱ्यांसाठी असलेली स्वच्छतागृहे बंद करून त्या जागा सलून-गुटखा विक्रीसाठी देणे
• संचालकांकडूनच पार्किंगच्या नावाखाली लूट
• सुरक्षारक्षकांच्या भरतीत भ्रष्टाचार
• गुंडांचा सर्रास वापर
• स्वच्छता कंत्राटातील गैरव्यवहार
…असे अनेक घोटाळे या समितीत खुलेआम सुरू आहेत.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेले डीडीआर जगताप हेच गैरव्यवहारात अडकले असल्याचा दावा लवांडे यांनी केला. यापूर्वीही हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता मात्र   पारदर्शक चौकशी झालेली नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
लवांडे यांनी आरोप केला की, गैरव्यवहारावर पांघरूण घालण्यासाठी अधिकारी व मंत्र्यांपर्यंत हप्ते पोहोचतात, अशी चर्चा आहे. त्यामुळे पुढील १५ दिवसांत सरकारने कठोर कारवाई केली नाही, तर शेतकऱ्यांसह मोठं आंदोलन उभारलं जाईल, असा इशारा त्यांनी दिला.