पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत आधुनिक रस्ता स्वीपिंग मशिन कार्यान्वित; स्वच्छतेला नवा वेग

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात स्वच्छतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते अत्याधुनिक रस्ता स्वीपिंग मशिनचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला समितीचे सभापती प्रकाश जगताप, उपसभापती शशिकांत गायकवाड, सचिव डॉ. राजाराम धोंडकर, जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट, प्रदीप कंद, माजी सभापती दिलीप काळभोर यांच्यासह समितीचे संचालक, शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते.
दररोज हजारो शेतकरी व व्यापारी ये-जा करणाऱ्या बाजार आवारात मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होत असतो. याच पार्श्वभूमीवर स्वच्छतेसाठी अत्याधुनिक रस्ता स्वीपिंग मशिन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या मशिनमुळे साफसफाई अधिक जलद, कार्यक्षम व परिणामकारक होणार असून, बाजार आवारातील वातावरण स्वच्छ व निरोगी राहणार आहे.
यापूर्वी समितीकडून कचरा गोळा करण्यासाठी लोडर ट्रॅक्टर खरेदी करण्यात आला होता. आता नव्या मशिनच्या मदतीने स्वच्छता प्रक्रियेला अधिक गती मिळणार असल्याचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी सांगितले.