उन्हाच्या तडाख्याने शेतकऱ्यांचे हाल
पुणे: जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता कमालीची वाढली आहे. त्याचा परिणाम शेतीकामांवर होताना दिसत आहे. उन्हामुळे कामाची पद्धत बदलली आहे. सकाळी लवकर व सायंकाळी उशिरापर्यंत काम करत दुपारी उन्हाच्या काळात काम करणे टाकले   जात आहे. उन्हामुळे शेत मशागतीची कामेही खोळंबली आहेत.जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून सातत्याने वातावरण बदल होत आहे. दीड महिन्यात सुमारे सात ते आठ वेळा जोरदार वादळ, पाऊस, गारपीट झाली. ऊन, ढगाळ वातावरण तर सततच होते. त्यामुळे कांदा, फळपिके, भाजीपाल्याचे नुकसान झाले. पाच-सहा दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. सध्या ४१ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान आहे. त्यामुळे सकाळी नऊ वाजताच उन्हाची तीव्रता जाणवते. सध्या उन्हाळी बाजरी, कांदा काढणीचे काम वेगाने सुरू आहे. मात्र उन्हाच्या तीव्रतेचा शेतीकामांवर परिणाम होत असल्याचे दिसत आहे. मात्र या साऱ्या बाबीचा कामांवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. तापमानात वाढ झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतमजूरांसह ग्रामस्थ व जनावरांचे हाल होत आहेत. उन्हामुळे पशू, पक्ष्यांचेही हाल होत आहेत.