कापूस खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक व कार्यक्षम करणार-पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई :- कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी शासन कटिबद्ध असून, कापूस खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी दिली.
मंत्री रावल यांनी सांगितले, यंदा राज्यात १२४ खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली असून, १६ मार्चपर्यंत १४२.६९ लाख क्विंटल कापूस खरेदी झाला आहे. सुमारे १० हजार कोटी रुपयांची खरेदी झाली आहे. सॉफ्टवेअर हॅकिंगमुळे फेब्रुवारी महिन्यात १५ दिवस खरेदी प्रक्रिया बंद झाली होती. आता ही अडचण दूर करण्यात आली असून, १५ मार्चपर्यंत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जाणार आहे. यंदाच्या मोसमात काही शेतकऱ्यांची नोंदणी राहिली असल्यास त्यासाठी मुदत वाढविण्यावर सकारात्मक विचार केला जाईल.
तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील तीन केंद्रांवर विनापरवाना खरेदी व खरेदी केंदे विनापरवाना बंद केल्याबद्दल कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात सदस्य अमित झनक यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य नाना पटोले, रोहित पवार, हरीश पिंपळे यांनी सहभाग घेतला.