बांगलादेशच्या एका निर्णयामुळे नाशिकमधील द्राक्ष बागायतदार चिंतेत! द्राक्ष्याचे दर 50 टक्क्यांनी गडगडले

नाशिक : वर्षभर मेहनत घेऊन पिकवलेली निर्यातक्षम अव्वल दर्जाची द्राक्षं निम्म्या किंमतीत विकायची वेळ नाशकातल्या शेतकऱ्यांवर आली आहे. खरंतर आखाती आणि बांगलादेशसारख्या देशात उन्हाळ्यात द्राक्षांची मोठी निर्यात होते. मात्र, यावर्षी बांगलादेशने अपेक्षित द्राक्ष खरेदी केली नाही. याचा फटका शतेकऱ्यांना बसला आहे.
देशांतर्गत कलहामुळे बांगलादेशनं यंदा द्राक्षांवर 120 रुपयांपर्यंत निर्यातशुल्क लावल आहे. त्यामुळं नाशिकच्या द्राक्षांच्या दर 200 ते 250 रुपये किलोपर्यंत गेला. त्यात रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर द्राक्ष पॅकेजिंग बंद होतं. त्यामुळं तब्बल 12 ते 15 हजार टन द्राक्षांची निर्यातच झाली नाही. ही सगळी द्राक्षे स्थानिक बाजारात विक्रीसाठी दाखल झाली. परिणामी, द्राक्ष्याचे दर तब्बल ५० टक्क्यांपर्यंत घसरले आहेत.
आधीच एप्रिलमधील अवकाळी पावसानं द्राक्षांचं नुकसान झालं. व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर जायला तयार नाहीत. त्यात आता उन्हाळ्यात आंबा, खरबूज, कलिंगड बाजारात आलेत. त्यामुळं द्राक्षांची मागणी मंदावलीय. खरंतर मोठं परकीय चलन आणण्यासाठी द्राक्ष पीक ओळखलं जातं. मात्र यंदा निर्यातीलाही फटका बसलाय. त्यामुळं सरकारने योग्य धोरण अवलंबून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होतेय.
नाशिक जिल्ह्यात अजूनही 20 ते 25% द्राक्ष बागा निघायच्या शिल्लक आहेत. मात्र बांगलादेशच्या वाढीव निर्यातशुल्कामुळे निर्यात कमी झालीय. तर स्थानिक बाजारात दर गडगडलेत. हे दरवर्षीचंच चित्र झालंय. त्यामुळं निदान यंदातरी सरकारने ठोस धोरण ठरवून द्राक्ष उत्पादकांना दिलासा द्यावा इतकी अपेक्षा.