गेल्या आठवड्यात पावसाची दांडी, पावसाच्या ब्रेकमुळे शेतकरी चिंतेत
पुणे: राज्यात जुलै महिन्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला. विदर्भ आणि कोकणात अतिवृष्टी झाली होती. पुरामुळे काही गावांशी संपर्क तुटला होता. यामुळे ऑगस्ट महिन्यात राज्यात सर्वसाधारण पाऊस होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने दडी मारली आहे. अजून राज्यात पावसाचा ब्रेक असणार आहे. पावसाची ही विश्रांती २० ऑगस्टपर्यंत असणार आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
कधी परतणार पाऊस
राज्यात गेल्या दहा दिवसांपासून पाऊस नाही. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात सामन्यापेक्षाही कमी पाऊस झाला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, नांदेड या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली आहे. परंतु सातारा, सांगली, नगर, औरंगाबाद, बीड, जालना, हिंगोली, अकोला, जळगाव या जिल्ह्यात अजून पावसाची प्रतिक्षा आहे. राज्यात २० ऑगस्टनंतर पाऊस परतण्याची शक्यता आयएमडीने व्यक्त केली आहे.
चार आठवड्यांचा अंदाज
हवामान विभागाने देशातील मान्सूनसंदर्भात चार आठवड्यांचा अंदाज जारी केला आहे. त्यानुसार पहिली दोन आठवडे अनेक ठिकाणी सामान्यपेक्षा कमी पाऊस असणार आहे. तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात सामान्य पाऊस असणार आहे. ११ ऑगस्टपासून ७ सप्टेंबरपर्यंतचा हा अंदाज वर्तवला आहे.
शेतकरी चिंताग्रस्त
जालना जिल्हयात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांनी पेरणी करताना खते आणि बियाणे खरेदी केली होती. त्यासाठी अनेकांनी व्याजाने पैसे काढले होते. परंतु आता पाऊस नसल्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. राज्यातील अनेक भागात ही परिस्थिती आहे. आता येत्या काही दिवसांत पाऊस बरसला नाही तर शेतकऱ्यांचे मोठा आर्थिक नुकसान होणार आहे.
नंदुरबारात ३० टक्केच पाऊस
पावसाळा सुरू होऊन दोन महिने पूर्ण होत आले आहे. परंतु नंदुरबार तालुक्यातील पूर्वपट्ट्यात अजूनही दमदार पाऊस झाला नाही. नंदुरबार तालुक्यातील पूर्वपट्ट्यात सरासरीचा अवघा ३० टक्के पाऊस झाला आहे. यामुळे या भागांतील धरणांमध्येही जलसाठा झाला नाही.